मराठा मूक मोर्चाचे काटेकोर नियोजन
By Admin | Published: October 22, 2016 03:27 AM2016-10-22T03:27:07+5:302016-10-22T03:27:07+5:30
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर रविवारी सकल मराठा मोर्चाचे शिस्तबद्ध नियोजन जिल्हाधिकारी, शासकीय अधिकारी आणि सकल मराठा पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त
पालघर : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर रविवारी सकल मराठा मोर्चाचे शिस्तबद्ध नियोजन जिल्हाधिकारी, शासकीय अधिकारी आणि सकल मराठा पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीतून करण्यात आले असून पार्किंग, आरोग्य, पाणी आदी महत्वाच्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
पालघरमध्ये झालेल्या आतापर्यंतच्या मोर्चांचे रेकॉर्डब्रेक करणारा हा मोर्चा असल्याने जिल्हा प्रशासनही सज्ज झाले आहे. या मोर्चासाठी गुजरात, वसई, विरार या भागातून ६० हजार दुचाकी व चारचाकी वाहने पालघरमध्ये वेगवेगळ्या मार्गावरुन येणार आहेत.
या मोर्चासाठी शुक्रवारी जिल्हा प्रचार आणि प्रसार रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने मराठा तरुण उपस्थित होते. जिल्हा मोर्चा नियोजन समितीने बोईसरहून येणाऱ्या वाहनांसाठी प्रांत कार्यालयाजवळील दुग्ध प्रकल्प विभागाजवळील जागा, अग्निशमन केंद्राजवळील जागा, नंतर मनोरहून येणाऱ्यांसाठी सेंट जॉन कॉलेजजवळ, तर सफाळे मार्गावरून येणाऱ्यासाठी ट्विंकल स्टार शाळा समोर पार्किंग व्यवस्था केंद्र उभारण्यात आले आहेत.
वैद्यकीय सुविधेसाठी पालघर रेल्वे स्टेशन, तहसील कार्यालय पालघर, आर्यन ग्राउंड व जिल्हाधिकारी कार्यालय रस्ता येथे तात्पुरती प्राथमिक उपचार केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्याचबरोबर अत्यावश्यक सेवा म्हणून ग्रामीण रु ग्णालय, पेट्रोलपंप, अशा ठिकाणी १२ रुग्णवाहिकांचा ताफा उभा असणार आहे. पालघरमधील खाजगी रु ग्णालयात काही बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. नैसर्गिक विधीसाठी फिरते शौचालय, पाणी, अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे.
वाहतुकीचे मार्ग निश्चित
पालघर शहरातील मोर्चाच्या गर्दीचा आढावा घेत पालघर शहरातील वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी रविवारी पालघर शहरातून बोईसर आणि मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी टेम्भोडे, चाफेकर महाविद्यालय-खारेकुरण कल्याण नाका, थेट प्रांत कार्यालय, बोईसर मुख्य रस्ता, कोळगाव, पोलीस मैदान-जेनेसीस औद्योगिक वासहतीतून नंडोरे नाका, मनोर मुख्य रस्त्याकडे निघता येणार आहे. तसेच बोईसर बाजूकडून मुंबई कडे जाणारी वाहनेही या रस्त्याकडून वळविण्यात आली आहे. पालघर शहरात येणाऱ्या औद्योगिक वसाहतीतून अवजड वाहनांना रविवारी बोईसर पालघर रस्ता, पालघर ते चार रस्ता, ते रेल्वे स्टेशन, चार रस्ता ते टेम्भोडे नाका, पालघर स्टेशन ते माहीम वळण नाका व हुतात्मा स्तंभ पालघर ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी अवजड वाहतूक सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे.