‘उमेद’ अभियानाच्या खाजगीकरणाविरोधात जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 11:32 PM2020-11-09T23:32:34+5:302020-11-09T23:33:06+5:30
या आंदोलनाला तालुक्यातील महिला ग्रामसंघाच्या पदाधिकारी, स्वयंसहाय्यता गटाच्या महिलांनी पाठिंबा दिला आहे.
जव्हार : राज्य सरकारने ‘उमेद’ म्हणजेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे खाजगीकरण करण्याचा घाट घातला आहे. या खाजगीकरणाविरोधात अभियानातील जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी गुरुवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये पालघर जिल्ह्यातील एकूण ४६ अधिकारी व कर्मचारी कामबंद आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत.
‘उमेद’च्या खाजगीकरणाच्या पार्श्वभूमीवर अभियानातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवा खंडित करण्यात आलेल्या आहेत. दि. १० सप्टेंबरला सेवा समाप्तीचा काढलेला आदेश रद्द करावा, पुनर्नियुक्तीचे आदेश देण्यात यावे, पदभरती व एकूण व्यवस्थापन हे कोणत्याही स्थितीत त्रयस्थ यंत्रणेकडून करण्यात येऊ नये, या मागणीसाठी पालघर जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचारी कल्याणकारी मंडळ यांच्या वतीने उमेद कार्यालयासमोर गुरुवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनाला तालुक्यातील महिला ग्रामसंघाच्या पदाधिकारी, स्वयंसहाय्यता गटाच्या महिलांनी पाठिंबा दिला आहे. विविध मागण्यांविषयी व कामबंद आंदोलनाबाबतचे निवेदन जिल्हा परिषद पालघर मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक, गटविकास अधिकारी, तहसीलदार यांना देण्यात आले आहे.