माकप आ. विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली जोरदार दूध एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 04:03 PM2020-08-01T16:03:29+5:302020-08-01T16:03:34+5:30

राज्यातील शेतकऱ्यांना दुधाला 30 ते 35 रुपये दर मिळत होते. मात्र लॉकडाऊनमुळे दूध मागणी घटल्याने दुधाचे भाव 17 रुपयांपर्यंत खाली कोसळले.

Strong Milk Elgar under the leadership of Vinod Nikole | माकप आ. विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली जोरदार दूध एल्गार

माकप आ. विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली जोरदार दूध एल्गार

googlenewsNext

पालघर – शेतकऱ्यांच्या खात्यावर लिटर मागे 10 रुपये थेट अनुदान द्यावे या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले आणि अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांच्या नेतृत्वाखाली मुसळपाडा वाकी डहाणू जि. पालघर या ठिकाणी जोरदार दूध आंदोलन झाले. यावेळी आ. निकोले म्हणाले की, लॉकडाऊनपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना दुधाला 30 ते 35 रुपये दर मिळत होते. मात्र लॉकडाऊनमुळे दूध मागणी घटल्याने दुधाचे भाव 17 रुपयांपर्यंत खाली कोसळले.

शेतकऱ्यांना अशा संकटात मदत व्हावी या उद्देशाने राज्य सरकारने प्रति दिन 10 लाख लिटर दूध खरेदी करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना या योजनेद्वारे किमान 25 रुपये दराची हमी देण्यात आली. प्रत्यक्षात मात्र ही योजना केवळ सहकारी दूध संघांनाच लागू करण्यात आली. राज्यातील 76 टक्के दूध संकलित करणाऱ्या खाजगी दूध कंपन्यांना यातून वगळण्यात आले. परिणामी सरकार प्रतिदिन 10 लाख लिटर दूध खरेदी करू शकले नाही. शेतकऱ्यांना यामुळे पुरेसा दिलासा मिळाला नाही. योजना सुरू असतानाही दुधाचे खरेदी दर यामुळे 17 रुपयांपर्यंत खाली आले. राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर आता दूध विकत घेण्याऐवजी किंवा कंपन्यांना अनुदान देण्याऐवजी सरळ शेतकऱ्यांना मदत करावी, प्रति लिटर 10 रुपयांचे अनुदान सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावे ही मागणी किसान सभा व संघर्ष समितीतर्फे आम्ही करत आहोत.

तसेच यावेळी किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे म्हणाले की, दुधाला प्रति लिटर किमान 30 रुपये भाव मिळावा यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रति लिटर 10 रुपयांचे अनुदान सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करा, 26 जून रोजी केंद्रातील मोदी सरकारने नोटिफिकेशन काढून बाहेरच्या देशातून 10 लाख टन दूध पावडर आयात करण्याचा घेतलेला शेतकऱ्यांचा घात करणारा निर्णय तातडीने रद्द करा, जेनेरिक मेडिसीनच्या निर्यातीच्या बदल्यात अमेरिकेतून दूध व दुग्ध पदार्थांच्या आयातीला परवानगी देण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय तातडीने रद्द करा, आणि देशांतर्गत गोदामांमध्ये पडून असलेल्या दूध पावडरला निर्यातीसाठी प्रति किलो किमान 50 रुपये अनुदान द्या, या मागण्यांसाठी आम्ही दूध आंदोलन करतो आहोत असे ढवळे म्हणाले.

आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, सीटूचे राज्य सचिव आमदार विनोद निकोले, किसान सभेचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत गोरखाना, किसान सभेचे भरत कान्हात व धनेश आक्रे, जनवादी महिला संघटनेच्या तालुका सचिव लता गोरखाना, डीवायएफआयचे डॉ. आदित्य अहिरे यांच्या सहीत अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Strong Milk Elgar under the leadership of Vinod Nikole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.