वसई, विरारच्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 11:43 PM2019-05-11T23:43:21+5:302019-05-11T23:43:39+5:30
गेल्या वर्षी नवापुर आणि अर्नाळा समुद्रात चक्री वादळ आले होते त्यामुळे त्या बाजूला मोठे नुकसान झाले होते. त
विरार/वसई : पालघर जिल्ह्यातील वसई तालुका हा आपात्तिच्यादृष्टीने सर्वात संवेदनशील असून या तालुक्यातील सर्व इमारतींचे स्ट्रक्चर आॅडिट होणे गरजेचे आहे, असे स्पष्ट मत यशदाचे संचालक तसेच पुणे महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सल्लागार कर्नल विश्वास सुपनेकर यांनी व्यक्त केले. ते वसई विरार महापालिका अग्निशमन विभागतर्फे आपत्ती व्यवस्थापन या विषयावर आयोजित कार्यक्र मात बोलत होते.
पुढील महिन्यात पावसाळा सुरु होणार असून त्याकाळात अतिवृष्टी, वादळ या आपत्तीवर नियंत्रण कसे मिळवता येईल हे जाणून घेण्यासाठी वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन विभागतर्फे त्यांचे आपत्ती व्यवस्थापन याविषयावर दोन दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. येथील अधिकारी-कर्मचारी खास करून अग्निशमन विभागाच्या फायर फायटर्स व अधिकाऱ्यांना शहरातील आपत्ती काळात नेमके काय करायचे याचे धडे देऊन ही कार्यशाळा त्यांनी यशस्वी केली.
त्यांनी माहिती देण्याअगोदर वसई तालुक्यातील प्रत्येक विभागाचा अभ्यास केला होता. त्या अभ्यासातून वसई तालुक्यातील प्रभाग समिती ‘अ’ हा आपत्तीच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक संवेदनशील असल्याचे अभ्यासाअंती समोर आले आहे. तसेच, महापालिका क्षेत्रातील प्रत्येक प्रभागचा अभ्यास होणे गरजेचे आहे. त्यात जनतेची संख्या किती आहे, इमारती किती, अति धोकादायक इमारती किती आहेत, झोपडपट्ट्या किती आहेत, आपत्तीच्याक्षणी किती लोकांना कुठे व कसं हलवता आलं पाहिजे याबाबत आतापासूनच अभ्यास व तयारी करणे गरजेचे आहे असा त्यांनी सल्ला दिला.
गेल्या वर्षी नवापुर आणि अर्नाळा समुद्रात चक्री वादळ आले होते त्यामुळे त्या बाजूला मोठे नुकसान झाले होते. तसेच, अर्नाळा समुद्र धोकादायक असल्याने विरारला पश्चिमेला नुकसान होण्याची जास्त शक्यता आहे. विरार पश्चिमेला फक्त पूर परिस्थितीच नाही तर सुनामी, भूकंप यासारख्या आपत्ती येण्याच्या देखील शक्यता आहेत. म्हणूनच आपत्तीच्या दृष्टीने विरार पश्चिमेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच याकडे कोणत्याच प्रकारचे दुर्लक्ष करता येणार नाही, असे ते म्हणाले.
गतवर्षीचा कटु अनुभवातुन घेतला धडा
मागील वर्षी जुलैमध्ये पावसाळ्यात अतिवृष्टी झाली होती. त्यातच वसई- विरार शहर महानगरपालिका परिसरात अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन येथील जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले होते. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने येथे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सुद्धा झाले होते.
त्यावेळी महानगरपालिकेच्या आपत्ती निवारण कक्ष तथा अग्निशमन विभागाने नागरिकांना आवश्यक सहाय्यता पुरवली होती, मात्र अशा गंभीर व आणीबाणीच्या प्रसंगांना यापुढेही तोंड देण्याकरिता अधिकारी व कर्मचारी वर्ग व सर्वतोपरी प्रशिक्षित असणे अत्यंत गरजेचे आहे.
त्या अनुषंगाने महानगरपालिका हद्दीत विविध आपत्ती उद्भवल्यास संबंधित यंत्रणांनी कशा प्रकारे कार्यवाही करावी व त्यास प्रतिसाद द्यावा आदी विषयाचे ज्ञान संबंधित विभागांना असणे आवश्यक आहे. त्यामुळेच महापालिका आयुक्त बळीराम पवार यांच्या आदेशाने पावसाळा पूर्व तयारी पाहता वसई विरार महानगरपालिका प्रशासनाने या आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करून यशदाकडून विविध मार्गदर्शनाचे धडे घेतले.