तलासरीत बससाठी विद्यार्थी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 02:45 AM2018-09-12T02:45:54+5:302018-09-12T02:45:56+5:30
आदिवासी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षणाच्या प्रवाहात येत असले तरी घरची आर्थिक परिस्थिीत त्यांची पावले रोखत आहे.
तलासरी : आदिवासी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षणाच्या प्रवाहात येत असले तरी घरची आर्थिक परिस्थिीत त्यांची पावले रोखत आहे. खिशात पैसे नसल्यामुळे प्रवास खर्च परवडत नाही. म्हणून मंगळवारी शाळेच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरुन मानव विकास च्या बससाठी आंदोलन केले.
गावातील शाळा सातवी आठवी पर्यंत आहेत त्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी तालुका परिसरातून तलासरीत येतात. परंतु या विद्यार्थ्यांना मानव विकासच्या बसेस उपलब्ध नसल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. रिक्षा टेम्पोतून यावे लागते. यात त्याचा वेळ, पैसा वाया जातो. तसेच त्याचे शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे या बसेस साठी शाळा व्यवस्थापनाकडून पंचायत समिती तलासरीला पत्र व्यवहार केला आहे. मात्र, पंचायत समितीचे शिक्षण विभाग व डहाणू एस टी डेपो चे अधिकारी चालढकल करीत असल्याने अखेर विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागले. या वेळी अधिकाऱ्यांनी तलासरी भागात बसेस सुरू करण्याचे अश्वासन दिले
स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडिया च्या वतीने मंगळवारी सकाळी हजारो विद्यार्थ्यांनी मानव विकासच्या बस साठी तलासरी नाक्यावर रस्त्यावरच ठिय्या दिला व बसेस सुरू करत नाही तो पर्यंत रस्त्यावर बसण्याचा निर्धार व्यक्त करताच अधिकारी वर्गाची धावाधाव झाली.
विद्यार्थ्यांनी या वेळी बसेस नसल्याने त्रास व आर्थिक ओढाताण होत असल्याचे सांगितले. या वेळी डहाणू डेपोचे सुनील वाघ यांनी आपली बाजू मांडताना पंचायत समिती कडून आलेले प्रस्ताव आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविले आहेत. पण अजून मंजुरी न आल्याने मानव विकासच्या बसेस सुरू झाल्या नसल्याचे सांगितले. तलासरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सदानंद जनाथे यांनी शाळांकडून आलेले प्रस्ताव डहाणू डेपोला पाठवीत असतो पण त्याच्या कडून कार्यवाही करण्यास टाळाटाळ होत असल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. जुलै महिन्यात दिलेले प्रस्तावावर कार्यवाही केली असती तर विद्यार्थ्यांना रस्त्यावर बसायची वेळ आली नसती असे त्यांनी सांगितले.
आजच्या घडीला तलासरी भागात मानव विकासच्या सहा बसेस रस्त्यावर धावत आहेत पण त्या फक्त मुख्य रस्त्यावरून असल्याने त्यांचा सर्वच विद्यार्थ्यांना फायदा होत नाही. बरेच विद्यार्थी खेड्या पाड्यावर राहत असल्याने त्यांना तीन ते चार किमी पायपीट करावी लागते. तेव्हा ते मुख्य मार्गावर येतात.
तलासरीतील शाळे साठी कासा चारोटी आंबोली पासून ते आच्छाड, डोंगरी, सायवन पासून विद्यार्थी येत असतात. मात्र, या मार्गावर बसेस धावतच नसल्याने विद्यार्थ्यांना रिक्षाने यावे लागते. तसेच आच्छाड, चारोटी आंबोली या गावातील मुली सकाळी लवकर येवून रिक्षा, जीप पकडतात. यामुळे शिक्षणाची गळती वाढत आहे.