९० टक्के न मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 09:21 AM2024-05-22T09:21:28+5:302024-05-22T09:21:48+5:30
अनुष्का ही मालाडच्या सराफ महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिकत होती. १२वीच्या परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळावेत, अशी तिची इच्छा होती.
मीरा रोड : १२वीत अपेक्षेपेक्षा कमी टक्के मिळाल्याने नाराज झालेल्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना भाईंदरमध्ये घडली. अनुष्का मेहेरबानसिंग कबसुरी असे विद्यार्थिनीचे नाव आहे.
अनुष्का ही मालाडच्या सराफ महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिकत होती. १२वीच्या परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळावेत, अशी तिची इच्छा होती. तसे ती बहिणीलाही सतत सांगायची. त्या अनुषंगाने ती अभ्यासही करत होती. मंगळवारी निकाल लागला. मात्र, तिला केवळ ७८ टक्के गुण मिळाले. त्यामुळे ती उदास झाली. आईनेही तिला समजावले.
दरम्यान, दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास आई आणि लहान भाऊ हा हॉलमध्ये असताना, तिने स्वयंपाकघरात जाऊन छताच्या पंख्याला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी नवघर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेने तिच्या आईवडील, भावंडांना धक्का बसला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.