विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य गेले वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 01:21 AM2019-08-07T01:21:20+5:302019-08-07T01:21:30+5:30

वाडा तालुक्यातील पाली आश्रमशाळेत पुराचे पाणी : विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले; अनेकांचे संसारही पाण्यात

Students carry educational materials gone | विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य गेले वाहून

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य गेले वाहून

googlenewsNext

वाडा : रविवारी झालेल्या महाप्रलयात पिंजाळी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकाठी पाली येथे असलेल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या शासकीय आश्रमशाळेतील इमारतीत पिंजाळी नदीचे पाणी शिरले. येथील तब्बल चारशे विद्यार्थ्यांचे कपड्यांसह शैक्षणिक साहित्य वाहून गेले आहे. विद्यार्थ्यांना वेळीच सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याने संभाव्य मोठा धोका टळला. या पुरामुळे नदीकाठच्या अनेकांचे संसार वाहून नेले. दरम्यान, येथील सर्वच वर्गखोल्यांमध्ये पुराच्या पाण्यातून आलेली घाण, गाळ, साप अडकले असल्याने हे वर्ग साफ होईपर्यंत येथील विद्यार्थ्यांना दहा दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची पहिली ते बारावीपर्यंतची शासकीय आश्रमशाळा वाडा तालुक्यातील पाली येथे आहे. या आश्रमशाळेत एकूण ६२१ विद्यार्थी, असून यामधील ४३० विद्यार्थी, विद्यार्थिनी हे निवासी आहेत. शनिवार (३ आॅगस्ट ) पासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने रविवारी सकाळीच पिंजाळी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला. बघता, बघता नदीने धोक्याची पातळी ओलांडली. पाण्याचा अंदाज घेऊन येथील शिक्षकांनी शनिवारी संध्याकाळीच विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलवले. मात्र या विद्यार्थ्यांच्या पेट्या, कपडे, वह्या, पुस्तके आणि अन्य शालेय शैक्षणिक साहित्य आश्रमशाळेतच अडकून राहिले. रविवारी सकाळी पिंजाळी नदीला आलेल्या पुराच्या तडाख्यातून आश्रम शाळा देखील सुटली नाही. येथील विद्यार्थ्यांच्या बारा वर्ग आणि निवासी खोल्यांमध्ये दहा फुटांपर्यंत पाणी गेल्याने खोल्यांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य, कपडे, गाद्या आदी साहित्य पुरात वाहून गेले. काही साहित्य वर्ग खोल्यांमध्ये अडकून पूर्णत: खराब झाले आहे. तसेच शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या ९ निवासस्थानात पाणी गेल्याने त्यांच्याही साहित्याचे नुकसान झाले आहे.

पिंजाळी नदीला पूर आल्यावर पाली आश्रमशाळेत पाणी जात असते. येथे नेहमीच उद्भवणारी परिस्थिती पाहता या आश्रम शाळेची नवीन इमारत नदीपात्रापासून काही अंतरावर बांधण्यात आली आहे. मात्र येथे पाच वर्षांपासून बुधवली येथील आश्रमशाळा भरत आहे. तेथील इमारत धोकादायक झाल्यापासून साडेतीनशे विद्यार्थी पाली येथे स्थलांतरित केले आहे.

पावसाचा जोर कमी तर पाण्याचा प्रश्न ऐरणीवर
विरार : पुराचे पाणी ओसरले असले तरी वादळी वाºयामुळे महावितरणच्या विद्युत यंत्रणांमध्ये बिघाड झाला असून वीजेचा लपंडाव सुरु आहे. तसेच सखल भागातील दुकानांमध्ये देखील पाणी शिरल्याने दुकानदारांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. पाऊस थांबल्यानंतर नागरिकांना आता वेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित होणे आणि पाणी टंचाई सारख्या समस्या आहेत. सखल भागातील सोसायट्यांच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये देखील पाणी गेल्याने पालिकेचे पाणी वापरणे शक्य होत नाही. टाकी स्वच्छ होईपर्यंत नागरिकांना पाण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. गेल्या महिन्यात झालेल्या पूरस्थितीमध्ये दुकानदारांचे व नागरिकांचे सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यातून सावरण्याचा प्रयत्न करत असताना नागरिकांचे अजूनच बिकट हाल झाले आहेत. नाले व गटारी तुडुंब भरले असल्याने पाण्याचा निचरा देखील धिम्या गतीने होत आहे. तसेच पूरस्थिती नंतर पाणी ओसरल्याने परिसरात कचरा व चिखल शिल्लक राहिला आहे.

काही भागांमध्ये सफाईचे काम सुरु झालेले आहे तर सकल भागाचे पाणी पूर्णपणे ओसरले की लगेचच सफाई कर्मचारी कामाला सुरुवात करतील.
- राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता, मनपा

वसईतील चुळणे गाव अजूनही जलमय
वसई : चार दिवस सतत पडणाºया मुसळधार पावसाने सोमवारी विश्रांती घेतली आणि बुधवारी पुन्हा थोडी थोडी रिपरीप सुरु केली असली तरी वसई शहराच्या अनेक भागांतील पाण्याचा निचरा अद्याप पूर्णपणे झालेला नाही. आजही अनेक रस्ते, गावे, पाडे आणि परिसर पाण्याखाली गेले आहेत. इमारतींच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत सुध्दा पावसाचे पाणी गेल्याने रोगराईचे संकट आहे.
शुक्रवारी रात्रीपासून पडणाºया मुसळधार पावसामुळे शनिवार पहाटेपासूनच शहरातील सखल भागांमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली. शनिवारी संध्याकाळी पाण्याची पातळी वाढू लागली. सोमवारी पावसाने विश्रांती घेतली असली तरी सखल भागातील पाण्याचा अजूनही पाहिजे तसा निचरा झालेला नाही. शहराच्या अनेक भागातील सोसायट्यांमध्ये अद्यापही पाणी साचून आहे.
त्यातच मीटर बॉक्सच पाण्यात असल्याने शनिवार रात्रीपासून या परिसरांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे, तर काही भागात अजूनही सुरक्षेअभावी वीज देण्यात आलेली नाही. वसई, विरार, नालासोपारा, नायगाव पूर्व - पश्चिम, पश्चिम पट्टीत तर सागरी किनाºयावर बहुतांश घरांची पडझड झाली आहे. तर विरारच्या विराट नगर, मयेकर वाडी, चाणक्य चौक या परिसरांतील वीजवाहक तारा
तुटल्याने नागरिकांना विजेपासून वंचित राहावे लागत आहे. घरातील फर्निचरसह अनेक मौल्यवान सामानांचे नुकसान झाले आहे.सोसायट्यांच्या आवारात पाणी गेल्याने गाड्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक नागरिकांना गाड्या ढकलत गॅरेजपर्यंत न्याव्या लागल्या. मात्र गॅरेजमध्येही जागा नसल्याने गाड्या रस्त्यावर उभ्या करण्यात आल्या आहेत.

Web Title: Students carry educational materials gone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.