विद्यार्थ्यांनी घेतला प्रत्यक्ष निवडणुकीचा अनुभव; कासा कॉलेजचा स्तुत्य उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 12:50 AM2020-02-06T00:50:20+5:302020-02-06T00:50:50+5:30
लोकशाही पंधरवड्यानिमित्त आयोजन
कासा : लोकशाही पंधरवड्यानिमित्त डहाणू तालुक्यातील कासा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष निवडणूक मतदान प्रक्रियेचा अनुभव घेतला. ‘आजचे विद्यार्थी उद्याचे जागृत नागरीक’ या उपक्रमांतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लोकशाहीचा अनुभव घेता यावा यासाठी पूज्य आचार्य भिसे कनिष्ठ महाविद्यालयात लोकशाही पंधरवड्यानिमित्त प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली.
लोकशाहीच्या निवडणूक प्रक्रियेतून प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध करून मतदारयादी, उमेदवारी अर्ज वाटप, छाननी, माघार, निवडणूक चिन्ह वाटप, उमेदवार प्रचार आणि ईव्हीएम मशीनमधून प्रत्यक्ष मतदान, मतमोजणी, आणि निकाल या प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. या उपक्रमात ११ वीचे ३०७ विद्यार्थी सहभागी झाले होते.
ईव्हीएम मशीन तसेच साहित्य उपलब्ध करुन देण्यासाठी प्रांताधिकारी सौरभ कटीयार, तहसीलदार राहूल सारंग, नायब तहसीलदार राठोड यांचे सहकार्य लाभले. मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक अरुण खंबायत, शिक्षकवृंद उपस्थित होते.
लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांची भूमिका महत्त्वाची असते, या अनुषंगानेच विद्यालयात प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेचा अनुभव विद्यार्थ्यांना घेता यावा, यासाठी हा उपक्रम राबवल्याचे मुख्याध्यापक खंबायत यांनी सांगितले.
ईव्हीएम मशीन हाताळल्याने विद्यार्थी आनंदी
ईव्हीएम मशीन विषयी विस्तृत माहिती प्रा. रामकृष्ण पाटील यांनी दिली. निवडणुकीची जबादारी प्रा. हेमराज साळुंखे यांनी पार पाडली. मतदान अधिकारी म्हणून प्रा. वाडेकर, प्रा. कुसुम खोटरे, प्रा. योगिता मोरे, प्रा. प्रेमा वरखंडे उपस्थित होते. तर निवडणूक निर्णय अधिकारी मुख्याध्यापक अरुण खंबायत आणि सहा. निवडणुक अधिकारी, पर्यवेक्षक म्हणून सुभाष मूटकुळे यांनी जबाबदारी पार पाडली.