खुटल आश्रमशाळेत विद्यार्थिनींना करावी लागते पॅसेजमध्ये आंघोळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 11:48 PM2018-10-23T23:48:28+5:302018-10-23T23:48:35+5:30
बोईसर पूर्वेकडील खुटल येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळेमधील वयात आलेल्या विद्यार्थिनीना वर्षाच्या बारा महिने थंड पाण्याने तेही शाळेच्या पॅसेजमध्ये आंघोळ करावी लागते.
- पंकज राऊत
बोईसर : बोईसर पूर्वेकडील खुटल येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळेमधील वयात आलेल्या विद्यार्थिनीना वर्षाच्या बारा महिने थंड पाण्याने तेही शाळेच्या पॅसेजमध्ये आंघोळ करावी लागते. तर शाळेमध्ये बसण्यास बेंच नसल्याने विद्यार्थ्यांना जमिनीवर बसून शिक्षण घ्यावे लागते. या आश्रमशाळेला महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी सोमवारी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधल्या नंतर पत्रकारांना ही विदारक स्थिती सांगितली.
इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या या आश्रमशाळेमध्ये २६३ विद्यार्थी तर २७१ विद्यार्थिनी असे एकूण ५३४ विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यापैकी १४० विद्यार्थी व १६९ विद्यार्थिनी असे एकूण ३०९ विद्यार्थी या आश्रम शाळेत निवासी शिक्षण घेत आहेत.
२७१ विद्यार्थिनी पैकी २०५ विद्यार्थिनी ह्या १० ते १५ वयोगटाच्या आहेत. या आश्रमशाळेमध्ये जनरेटर आहे परंतु तो काही महिन्यांपासून नादुरु स्त असल्याने रात्री ७ ते १० पर्यंत भारिनयमनाच्या काळामध्ये चक्क मेणबत्त्यांच्या प्रकाशात विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागत आहे तर पाणी नसल्याने स्वच्छतागृहात घाणीचे साम्राज्य पसरल्याने आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
त्याचप्रमाणे वॉश बेसिनच्या नळांची ही अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने स्वच्छतेचे अक्षरश: तीन तेरा वाजले आहेत.
>जेवण-नाश्त्यात १२ तासाचा गॅप
संध्याकाळचे जेवण साधारणत: सहा ते साडेसहा पर्यंत दिले जात असून दुसऱ्या दिवशी सकाळी आठच्या सुमारास नाश्ता (सुमारे १५ किलोमीटर अंतरावरील कांबळगावच्या मध्यवर्ती स्वयंपाक घरातून येतो) दिला जातो हा गॅप १४ तासाचा होत असल्याने वाढत्या वयाच्या विद्यार्थ्यांना भुकेने व्याकूळ व्हावे लागते, असे त्या म्हणाल्या. त्यांच्या सोबत पालघर जिल्हा महिला रा. काँ.च्या अध्यक्षा नीलम राऊत, तालुका अध्यक्ष संजय पाटील, महिला अध्यक्षा महानंदा राऊत, जिल्हा निरीक्षक सोनल पेडणेकर व आफ्रिन शेख, नीलम मोरे, ललिता राऊत, निलिमा राऊत, कमल राऊत होत्या.