विद्यार्थ्यांची नावे जाणार थेट मंगळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 11:20 PM2019-07-09T23:20:34+5:302019-07-09T23:20:40+5:30
पहिलीतील ३६ विद्यार्थ्यांची नावनोंदणी : डहाणूतील जि.परिषदेच्या शिक्षकाचा पुढाकार
अनिरुद्ध पाटील।
लोकमत न्यूज नेटवर्क
डहाणू/बोर्डी : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गोवणे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या नावाची नोंद आता थेट मंगळावर होणार आहे. नासा नॅशनल एरोनोटिक्स अॅण्ड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशनचे ‘मंगळरोव्हर २०२०’ हे अंतरिक्षयान मंगळाच्या दिशेने झेपावणार आहे. या यानावरील स्टेन्सिल्ड चिपवर नावे पाठविण्याची संधी नासाच्यावतीने जगभरातील सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याअंतर्गत या विद्यार्थ्यांच्या नावाची नोंदणी केली जाणार आहे.
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गोवणे प्राथमिक शाळेतील शिक्षक पावबाके यांनी रविवार, ७ जुलै रोजी पहिल्या इयत्तेतील ३६ विद्यार्थ्यांची नावनोंदणी केली.
नासाच्या पसाडेना, कॅलिफोर्निया येथील जेट प्रोपुलशन लॅबोरेटरीतल्या (जेपीएल) मायक्रोडिव्हायसेस लॅबोरेटरीमध्ये इलेक्ट्रॉनिक बीमचा वापर करून सिलिकॉनच्या चिपवर मानवी केसाच्या एक हजाराव्या भागाइतक्या (७५ नॅनोमीटर) रुंदीत नागरिकांकडून नोंदविण्यात आलेली नावे स्टेन्सिल केली जाणार आहेत. इतक्या छोट्या आकारात एक डेमी आकाराच्या चिपवर तब्बल दहा लाख नावे मावतील. या चिप रोव्हरवर काचेच्या आवरणाखाली जतन करून मंगळावर पाठवल्या जातील. ऐतिहासिक मंगळ अभियानासाठी रोव्हर तयारी करत असताना, सर्वजण या नव्या मोहिमेत सहभागी व्हावेत, सर्वांना याची माहिती व्हावी, असे आम्हाला वाटते, असे नासाच्या वॉशिंग्टन येथील येथील सायन्स मिशनचे एसएमडी थॉमस झुरबुचेनचे म्हणणे आहे.
या मोहिमेअंतर्गत गोवणे शाळेतील विद्यार्थ्यांच्या नावांची आॅनलाइन नोंदणी केली असून त्या सर्वांचे आॅनलाइन बोर्डिंग पासही उपलब्ध झाल्याचे पावबाके यांनी सांगितले. विशेषत: मराठी भाषा आणि मराठी शाळा यांची अस्मिता जपत मराठीमध्ये त्यांची नोंदणी केली आहे. या उपक्र मांतर्गत मंगळावर पाठवण्याकरीता विद्यार्थ्यांचे किंवा शाळेचे नाव ३० सप्टेंबर २०१९ च्या रात्री ११.५९ पर्यंत ें१२.ल्लं२ं.ॅङ्म५ या संकेतस्थळावर नोंदणी करू शकता. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासह, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा तसेच अवकाश संशोधन शास्त्राचा प्रचार प्रसार करण्याची सुवर्ण संधी असल्याचे पावबाके म्हणाले.
मंगळावर नावे पाठवण्याच्या मोहिमेत तुर्की प्रथमस्थानी असून भारत दुसऱ्यास्थानी आहे. जास्तीत जास्त भारतीयांनी या मोहिमेत सहभाग नोंदवल्यास भारत देखील प्रथमस्थानी झेप घेऊ शकतो. जिल्ह्यातील शाळांमधून अशा नावनोंदणीस प्रारंभ झाला आहे.
- विजय पावबाके, शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गोवणे
तुम्हीही करू शकता नोंदणी : रोव्हर २०२० हे यान ‘अॅटलस व्ही ५४१’ या रॉकेटच्या मदतीने अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतातील कॅप कानावेराल इथल्या सैन्य दलाच्या तळावरून १७ जुलै २०२० ते ५ आॅगस्ट २०२० मध्ये लॉन्च केले जाणार आहे. ते २०२१ च्या फेब्रुवारी महिन्यात मंगळावर पोहोचण्याची शक्यता आहे. या उपक्र मांतर्गत आपले नाव मंगळावर पाठवण्यासाठी खालील लिंक ओपन करा आणि आपला बोर्डिंग पासही https://go.nasa.gov/Mars2020Pass मिळवता येतात.