डहाणू आदिवासी प्रकल्प कार्यालयावर विद्यार्थी-पालकांचा मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 05:56 PM2018-08-28T17:56:00+5:302018-08-28T17:58:13+5:30
पाचगणी येथील नचिकेता हायस्कूल ही नामांकित निवासी इंग्रजी शाळा बंद करण्याचा निर्णय अप्पर आयुक्त ठाणे यांनी 14 ऑगस्ट रोजी काढला.
डहाणू- पाचगणी येथील नचिकेता हायस्कूल ही नामांकित निवासी इंग्रजी शाळा बंद करण्याचा निर्णय अप्पर आयुक्त ठाणे यांनी 14 ऑगस्ट रोजी काढला. या शाळेत डहाणू आदिवासी प्रकल्पाअंतर्गत सुमारे साडेपाचशे विद्यार्थी शिक्षण घेतात. दरम्यान हा आदेश मान्य नसल्याचे सांगत, मंगळवार 27 ऑगस्ट रोजी विद्यार्थी- पालकांनी या प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढून अन्य शाळेत समायोजनाला विरोध दर्शविला.
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्यासंबंधी 2009 साली योजना शासन निर्णयाद्वारे राबविण्यात आली. याा वर्षी डहाणू आदिवासी प्रकल्पाअंतर्गत डहाणू, तलासरी, पालघर आणि वसई तालुक्यातील सुमारे साडेपाचशे विद्यार्थी पाचगणी येथील नचिकेता हायस्कूल मध्ये शिक्षण घेत आहेत. दरम्यान 14 ऑगस्ट 2018 रोजीच्या अप्पर आयुक्त ठाणे यांच्या परिपत्रकानुसार ही शााळा बंद करण्याचा आदेश काढण्यात आला आहे. त्यानुसार या विद्यार्थ्यांना अन्य शाळांमध्ये समायोजित केले जाणार आहे. मात्र या बद्दल विद्यार्थ्यांना सांगितल्यानंतर त्यांनी हंबरडा फोडला, काहींना भोवळ आली तर अनेकांना जेवणही जात नाही. या विद्यार्थ्यांनी अन्य शाळेत समायोजित होण्यास नकार दिला आहे. कोणालाही विश्वासात न घेता, हा निर्णय माथी मारला जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
या करिता आदिवासी प्रकल्प आणि जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनाही निवेदन दिले. मात्र प्रश्न सुटलेला नाही. शाळेचे संचालक मंडळ आणि प्रशासनातील अंतर्गत वादाचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. तत्काळ हा निर्णय मागे घेत, शाळा सुरू करण्याच्या मागणी करीत डहाणू प्रकल्प कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी विद्यार्थी-पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांनी सह्याचे सामुदायिक निवेदन प्रकल्प कार्यालयाला सादर केले. यावेळी काही विद्यार्थ्यांनी लोकमतशी भावना बोलून दाखवल्या, त्यांना अश्रू आवरणे अशक्य झाले होते.
दरम्यान तत्काळ तोडगा न निघाल्यास आगामी काळात निदर्शनं, मोर्चा आणि ठिय्या आंदोलन पालघर जिल्ह्यात छेडण्यात येईल, अशी माहिती पालकांचे प्रतिनिधी कृष्णा कुवरा यांनी लोकमतशी बोलताना दिली.