रेतीमाफियांनी शाळा,महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाच जुंपले कामाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 02:58 AM2018-04-21T02:58:44+5:302018-04-21T02:58:44+5:30
रुपेरी वाळू, सोनेरी लाटा आणि त्यावर डोलणारी होडकी हे सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालते. मात्र रेती चोरी आणि माफियांच्या दहशतीने हा किनारा धोकादायक बनला असून या बाबत पोलीस व महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने माफियांचे फावले आहे.
- अनिरुद्ध पाटील
बोर्डी : रुपेरी वाळू, सोनेरी लाटा आणि त्यावर डोलणारी होडकी हे सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालते. मात्र रेती चोरी आणि माफियांच्या दहशतीने हा किनारा धोकादायक बनला असून या बाबत पोलीस व महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने माफियांचे फावले आहे.
येथील नरपड, चिखले, घोलवड आणि बोर्डीच्या समुद्रात वाहनं उतरवून रेती उपशाकरिता १२ ते २२ वयोगटातील शाळा-महाविद्यालयीन ॅविद्यार्थ्यांचा वापर होतो. त्यांना आकर्षित करण्यासाठी मोबाईल, दुचाकी आणि मद्याचे आमिष दाखवले जाते.
रात्री आठ ते पहाटे पाच दरम्यान हा प्रकार घडतो. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षतेने पर्यावरणाची प्रचंड हानी होत आहे. तरु ण वर्ग गुन्हेगारीकडे वळल्याने रेती चोरांच्या गटांमध्ये कमालीचा संघर्ष आहे. त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसतोय. सार्वजनिक उत्सव आणि लग्नसराई काळात या दडपणाचा सामना त्यांना करावा लागतो. त्यामुळे किनाऱ्यावर मॉर्निंग व इव्हिनिंग वॉकसाठी जाण्याचे प्रमाण ही घटले आहे. लगतचा डहाणू- बोर्डी प्रमुख राज्य मार्ग रात्री आणि पहाटे धोकादायक बनला असून प्रशासनाने वेळीच उपाय न योजल्यास निष्पापांचा बळी जाण्याची शक्यता आहे.