नालासोपाऱ्यातील स्तुपाला बौद्ध धर्मीयांच्या प्रचाराचे केंद्र बनवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 11:06 PM2020-02-18T23:06:18+5:302020-02-18T23:06:32+5:30
दि बुद्धभूमी धम्मदूत संघ, संघमित्रा गंधकुटी बुद्ध विहार ट्रस्ट व आंतरराष्ट्रीय बौद्धधम्म
विरार : भगवान गौतम बुद्ध यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या नालासोपारा येथील अडीच हजार वर्षे जुन्या बौद्ध स्तुपाचे उत्खनन करून सुशोभिकरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या स्तुपाला जागतिक स्तरावरील बौद्ध धर्मीयांच्या प्रचाराचे केंद्र बनवण्याच्या विश्वास मुख्य आयोजक भदंत अथ्यदर्शी महाथेरो यांनी व्यक्त केला.
दि बुद्धभूमी धम्मदूत संघ, संघमित्रा गंधकुटी बुद्ध विहार ट्रस्ट व आंतरराष्ट्रीय बौद्धधम्म परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने नालासोपाराच्या बौद्ध स्तूप परिसरात पार पडलेल्या इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये भदंत अथ्यदर्शी महाथेरो बोलत होते. याप्रसंगी थायलंड, गुजरात, मुंबई या ठिकाणचे भक्त उपस्थित होते. भदंत अथ्यदर्शी महाथेरो यांनी सांगितले की, भगवान बुद्ध यांनी प्रत्यक्षात या स्तुपाला भेट दिली होती. या परिसरामध्ये पूर्ण त्यांचे शिष्य राहत होते. त्यांनी पर्णाकुटीचे निर्माण केले होते. त्याच्या उद्घाटनासाठी स्वत: गौतम बुद्ध सोपारा गावात आले होते. त्यानंतर सम्राट अशोकाने या स्तुपाची निर्मिती केली होती. याच स्तुपावरून सम्राट अशोकाची मुलगी संघमित्रा आणि मुलगा महेंद्र धम्माच्या प्रचारासाठी श्रीलंकेला गेले. श्रीलंकेतील बौद्ध धम्माचे मूळ केंद्र हे सोपारा बुद्ध स्तूप आहे. श्रीलंकेमधून बौद्ध धर्म थायलंडला गेला. थायलंड-वरून काही लोकांनी या स्तुपाला भेट दिली होती. तेव्हापासून या स्तुपाचा विकास व्हावा, अशी भक्तांमध्ये इच्छा होती. पुरातत्त्व खात्याच्या सर्वेक्षणाच्या निमित्ताने या स्तुपाचे लवकरच उत्खनन करण्यात येणार आहे. याद्वारे बौद्ध स्तुपाची जी मूळ जागा आहे ती परत मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे जगभरातील बौद्धांसह, देशातील, महाराष्ट्रातील व मुंबईतील भक्तांना श्रद्धेचे नवीन केंद्र मिळेल.