कोंढले येथील उपकेंद्र रखडले
By admin | Published: May 6, 2016 01:17 AM2016-05-06T01:17:42+5:302016-05-06T01:17:42+5:30
तालुक्यातील वाढती लोकसंख्या व औद्योगिकरण याचा विचार करून महावितरणने कोंढले येथे २०११ मध्ये ४०० के.व्ही.एच्या वीज उपकेंद्राला मंजुरी देऊन कामाला सुरूवात केली
वाडा : तालुक्यातील वाढती लोकसंख्या व औद्योगिकरण याचा विचार करून महावितरणने कोंढले येथे २०११ मध्ये ४०० के.व्ही.एच्या वीज उपकेंद्राला मंजुरी देऊन कामाला सुरूवात केली होती. मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे मुदत संपून गेली तरी ते काही पूर्ण झाले नाही. त्यामुळे कुडूस परिसरातील उद्योजक व नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. हे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी पंचायत समितीच्या माजी सदस्या अंकिता दुबेले यांनी केली आहे.
वाडा तालुक्यात ‘डी’ झोनमुळे उद्योगधंदे वाढले. गांध्रे (वाडा) येथे असलेल्या वीज वितरण केंद्रावर मोठा भार पडत होता. तसेच गावागावांच्या वीज जनित्रांमध्ये बिघाड होऊन अनेक गावे अंधारात बुडाल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यावर उपाय म्हणून वीज वितरण कंपनीने येथे ४०० के.व्ही. उपकेंद्राला मंजुरी दिली. २०११ मध्ये १९.७५ हेक्टर जागेवर २२ महिन्यांच्या मुदतीत हे काम पूर्ण करण्याच्या अटीवर महावितरणने या कामाचा ४२ कोटींचा ठेका ज्योती स्ट्रक्चर या कंपनीला दिला.
तिने हे काम एक वर्षात अर्धवट केले. त्या नंतर मुदत संपून ५ वर्षे झालीत तरी काम बंद आहे. या उपकेंद्रातून वीज मिळेल व आपली कंपनी सुरु होईल, या आशेवर तीनशेपेक्षा जास्त उद्योजक आजही आहेत. मात्र हे उपकेंद्र रखडल्याने वीज उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या कंपन्या बंद आहेत. शिवाय या परिसरातील विजेच्या लपंडावाने येथील नागरिक सुद्धा त्रस्त झाले आहेत. या वीज उपकेंद्राचे घोंगडे भिजत राहिल्याने उद्योजकांसह नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.
म्हणून महावितरणने याची तत्काळ दखल घेऊन हे काम त्वरित सुरू करावे, अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा दुबेले यांनी दिला आहे. या संदर्भात महावितरणचे वाड्याचे उपअभियंता लक्ष्मण राठोड यांच्याशी संपर्क साधला असता हे काम महाट्रान्समिशनकडे सोपविले असल्याची माहिती त्यांनी दिली.