दुर्मीळ कासव-मत्स्य प्रजाती वाचविण्याच्या मोहिमेला यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2020 11:21 PM2020-11-06T23:21:50+5:302020-11-06T23:22:19+5:30
rare tortoise : मुरबे येथील मिलन तरे या मच्छीमाराने २५ फूट व्हेल माशाची सुखरूप सुटका करण्यात यश मिळविले आहे.
पालघर : समुद्रातील नामशेष होण्याच्या मार्गातील विविध प्रकारचे मासे आणि कासव यांच्या दुर्मिळ प्रजाती वाचविण्यासाठी वन विभाग आणि मत्स्य विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या बक्षीस मोहिमेला मच्छीमारांमधून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मुरबे येथील मिलन तरे या मच्छीमाराने २५ फूट व्हेल माशाची सुखरूप सुटका करण्यात यश मिळविले आहे. समुद्रातील अनेक प्रजातींपैकी विविध प्रकारचे शार्क, व्हेल, कासव आधी प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर असून या प्रजातींना संरक्षण मिळावे म्हणून कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाने २१ डिसेंबर २०१८ रोजी एक आदेश काढला आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत समुद्रातील दुर्मिळ होत चाललेल्या अनेक प्रजाती संरक्षित करण्यात आलेल्या आहेत.
पालघर जिल्ह्यातील वसई ते
झाई या ११२ कि.मी.दरम्यान ४ ते ५ हजार लहान-मोठ्या बोटींद्वारे
मासेमारी केली जात असून मच्छीमारांच्या जाळ्यात शासनस्तरावरून दुर्मीळ ठरविल्या गेलेल्या व्हेल शार्क, जॉईंट गिटार फिश, इंडियन ओशियन हम्पबॅक डॉल्फिन, ऑलिव्ह रिडले कासव, लॉगरहेड, हॉक्स बिल, लेदर बॅक समुद्री कासव अशा अनेक प्रजाती अडकल्यामुळे त्यांना सोडविताना मच्छीमारांच्या जाळ्यांचे मोठे नुकसान होत असे.
जाळ्यांचे होते नुकसान
कधी कधी आपल्या जाळ्याचे नुकसान होऊ नये म्हणून काही मच्छीमार या प्रजाती समुद्रात सोडण्याचे प्रयत्न करीत नसल्याने त्या प्रजातीच्या जीवितास धोका निर्माण होतो.
यासाठी मच्छीमारांना आपल्या जाळ्याच्या नुकसान भरपाईपोटी काही रक्कम देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
त्या अनुषंगाने नुकसान भरपाईपोटी २५ हजार रुपये अनुदान मुख्य वनसंरक्षक कांदळवन विभाग, मॅनग्रोव्हस सेल-मार्फत मच्छीमारांना मिळावे, असे आदेश देण्यात आले होते. पालघर-ठाण्यातील ३८ मच्छीमारांच्या खात्यात पाच लाखाहून अधिक रक्कम जमा झाली आहे.