लॉकडाऊन काळातील यश; मनरेगातून फळबाग लागवडीमध्ये डहाणू राज्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 01:32 AM2020-12-01T01:32:27+5:302020-12-01T01:33:19+5:30
शासनाच्या कृषी विभागांतर्गत पालघर जिल्ह्याच्या डहाणू कार्यालयाचे प्रमुख तालुका कृषी अधिकारी संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीरीत्या केली जाते.
अनिरुद्ध पाटील
बोर्डी : पालघर जिल्हा कृषी विभागासह डहाणू तालुका कार्यालयाने अथक परिश्रम करून मानाचा तुरा रोवला आहे. शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २०२०-२१ वर्षात डहाणूने १७३५ शेतकऱ्यांना ९२९ हेक्टर लागवडीचा लाभ देऊन राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्यांनी लॉकडाऊनकाळात हे यश प्राप्त करून कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
शासनाच्या कृषी विभागांतर्गत पालघर जिल्ह्याच्या डहाणू कार्यालयाचे प्रमुख तालुका कृषी अधिकारी संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीरीत्या केली जाते. उत्तर कोकणातील हा भाग बागायतीकरिता प्रसिद्ध असल्याने नागरिकांचा फळलागवडीकडे वाढता कल आहे. त्यामुळे मनरेगा योजनेतून फळलागवडीचा उपक्रम पूर्ण क्षमतेने राबविण्याच्या कार्यात अधिकाऱ्यांपासून कृषीसेवकांनी कंबर कसली. या पथदर्शी योजनेत आदिवासी शेतकरी मुख्य लक्ष्य असल्याने त्यांना २३,०८६ काजू कलमे, २८,०५२ आंबा कलमे, ३,४०५ चिकू, १,०९० नारळ, १,३४० शेवगा व २७० अन्य फळझाडे असे एकूण ५७,२३४ कलमी रोपे या योजनेतून निःशुल्क वाटप करण्यात आली आहेत. पालघर जिल्ह्यात काजू कलमांची उपलब्धता कमी असल्याने २३,०८६ इतकी कलमे थेट रत्नागिरीतील शासकीय रोपवाटिकेतून खरेदी करण्यात आली. ही कलमे थेट मालवाहू एसटीने शेतकऱ्यांच्या बांधावर उपलब्ध करून देण्यात आली. डहाणू तालुक्याला ९०० हेक्टर क्षेत्राचा लक्ष्यांक देण्यात आला होता. परंतु, लक्ष्यांकाहून जास्त लागवड करून तालुक्याने राज्यात प्रथम स्थान पटकावले आहे. कोरोना कालावधीत शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून देण्यात आल्याची माहिती तालुका कृषी कार्यालयाने दिली.
या योजनेंतर्गत पहिल्या वर्षी ८६,४८८ रुपये इतकी मजुरी व सामग्रीचे अनुदान, दुसऱ्या वर्षी ३७,३३४ रु. तर तिसऱ्या वर्षी ३६,८३८ रु. याप्रमाणे तीन वर्षांत अनुदान आणि ५९८ दिवस रोजगार मिळणार असल्याचे मार्गदर्शन मंडळ अधिकारी सुनील बोरसे यांनी केले.
- प्रकाश सोनजी महाले, लाभार्थी, ब्राह्मणवाडी