शालेय सुट्यांतील अचानक बदलाने शिक्षकांची गोची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 02:45 AM2018-09-23T02:45:19+5:302018-09-23T02:45:32+5:30
पालघर जिल्हा परिषदेने वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारीमध्ये पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक शाळांकरीता सुट्टीच्या यादीला मान्यता दिलेली असतांना अचानक
- सुरेश काटे
तलासरी - पालघर जिल्हा परिषदेने वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारीमध्ये पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक शाळांकरीता सुट्टीच्या यादीला मान्यता दिलेली असतांना अचानक गणपतीच्या १४ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या अगोदरच जाहीर केलेल्या सुट्टीत ११ सप्टेंबरला अचानक बदल करून त्या १२ ते १७ सप्टेंबर अशा केल्याने गौरी गणपतीच्या सणाला गावी जाणार्या शिक्षकांची मात्र चांगलीच गोची झाली.
आधीच्या सुट्टयांप्रमाणे सर्वांनी जाण्याचे व परतीचेही रेल्वे, बसची आरक्षणे अगोदरच करून ठेवली होती. त्यामुळे अनेकांना आर्थिक भुर्दंडासह मनस्ताप सहन करावा लागला. अनेकांनी गावी जाणे रद्द केले तर जे गेले त्यांनी अक्षरश: महिला व लहान लहान मुलांसह जीवघेण्या गर्दीतून त्रास सहन करत परतीचा मार्ग धरला. सलग सुट्टी दिल्याने कुटुंबीयां सोबत काही वेळ घालविता येणार अशा आनंदात असलेल्या शिक्षकांच्या आनंदावर विरजण पडले.
यापुढे जिल्हा परिषद प्रशासनाने सण, उत्सवाच्या मोठ्या सुट्ट्यांमध्ये बदल करतांना तो अचानक न करता किमान आठवडाभर तरी आधी करावा जेणेकरून तो सर्वसमावेशक राहिल. अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या सुटटयांमध्ये बदल का केला? हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील चलो जीते हैं हा लघुपट दाखविण्यासाठी हा बदल केल्याची चर्चा आहे. तसे असेल तर हा लघुपट १८ ऐवजी २१ लाही दाखवता आला असता. अनेक जिल्हा परिषदांनी तो लघुपट गणपती सुट्टीनंतर दाखविला आहे. मग येथेच हा अट्टाहास कशासाठी? जाहीर केलेल्या सुट्टीत बदल करून सर्व शिक्षकांची धावपळ उडविणे योग्य नाही,अशी भावना आहे.
जीते है नही, ‘मरते है।’
इतरवेळी छाती काढून कार्यालयात ठाण मांडून असणारे शिक्षकांचे तथाकथित कैवारी अशा वेळी मात्र कोणतीही ठोस भूमिका घेताना दिसत नाहीत. जीवघेणा परतीचा प्रवास करून नोकरीच्या ठिकाणी परतावे लागल्याने चलो मरते है हा अनुभव शिक्षकांच्या वाट्याला आला.