टँकर लॉबीला सुगीचे दिवस, प्रशासन पुन्हा ठरले अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 11:30 PM2019-01-03T23:30:23+5:302019-01-03T23:30:31+5:30
वाढती लोकसंख्या, वसई-विरार महानगरपालिकेच्या मर्यादा आणि यंदा परतीच्या पावसाने दिलेला दगा वसई तालुक्यातील टॅँकर लॉबीसाठी सुगीचे दिवस आणणारा ठरला आहे.
- सुनिल घरत
पारोळ : वाढती लोकसंख्या, वसई-विरार महानगरपालिकेच्या मर्यादा आणि यंदा परतीच्या पावसाने दिलेला दगा वसई तालुक्यातील टॅँकर लॉबीसाठी सुगीचे दिवस आणणारा ठरला आहे. एकीकडे वसईतुन टॅँकर हद्दपार झाल्याचे दावे सुरु असताना डिसेंबर महिन्यापासूनच त्यांनी धावपळ दिसू लागल्याने अपघातांचे प्रमाणही वाढणार असल्याची भिती निमिण झाली आहे.
गोखीवरे, वालीव, पेल्हार, कोपर, उसगाव, शिवनसई, खानिवडे, चंदनसार, भाटपाडा, विरार पूर्वेकडील फुलपाडा या भागातील विहीर आणि बोअरवेलमधून हे टँकर पाणी भरतात. खाजगी विहीर आणि बोअरवेल मालक पैशासाठी बेसुमार पाणी उपसा करु लागल्याने या भागातील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. त्यामुळे मे महिन्यापर्यंत विहिरीतील पाणी पुरेल का? या भीतीने, गावकरी चिंतेत आहेत.
हे व्यवसायिक टॅँकर पैसा कमावण्याच्या उद्देशाने मिळेल तिथून पाणी भरून नागरिकांना विकतात. या पाण्यावर कोणतीही प्रक्रि या केली जात नसल्याने दूषित पाणी पिण्याशिवाय लोकांना पर्याय नसते. पावसाळा ते फेब्रुवारीपर्यंत टँकरचे दर ९०० ते १२०० रु पये असतात. आता टँकरचे दर वाढू लागले असून ही किंमत १५०० रुपयांवर पोहचली आहे. जसजशी पाणी टंचाईची झळ वाढायला सुरु वात होईल तसतसा टँकरचे दर दोन हजार रुपयांच्या घरात पोचलेला असेल असे एका टॅँकर चालकांनेच लोकमतला सांगितले.
अनेक टॅँकर अनफिट आरटीओचे दुर्लक्ष
हे टँकर जुनाट, गळके, अनफिट असून, आरटीओ कार्यालयामध्ये सुमारे किती टँकरची नोंद आहे व किती टँकर बेकायदा पाण्याची वाहतूक करत आहेत याची उजळणी करण्याची परिवहन विभागाला गरज आहे. आठ वर्षांपेक्षा जुने झालेले ट्रक वापरण्यास बंदी आहे. याच ट्रकमध्ये फेरबदल करून त्याचे टँकरमध्ये बेकायदेशिरपणे रु पांतर करून वसईत त्याचा वापर केला जातो.
अनेक टँकर जुनाट, गळके, फिटनेस नसलेले आहेत. याची माहिती आरटीओ आणि वाहतूक पोलिसांना पण कारवाई मात्र नाही. यामुळे, रहदारीच्या रस्त्यावर भरधाव वेगाने चालवून दर वर्षाला निरपराध नागरिकांचे बळी घेणाऱ्या टँकर वाहतुकीवर परिवहन व वाहतूक पोलीस मेहेरबान का असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.