साखरे पूल गेला पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 01:37 AM2018-06-27T01:37:12+5:302018-06-27T01:37:14+5:30
तालुक्यात गेल्या २४ तासात धुवांधार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत अल्याने नदीनाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत.
विक्रमगड : तालुक्यात गेल्या २४ तासात धुवांधार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत अल्याने नदीनाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. अनेक नदी नाल्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणी पूल आणि मोºया उलटल्या आहेत. त्यामुळे अनेक गावांचा काही काळ संपर्क तुटला होता. सोमवारी विक्रमगड मध्ये १५५ तर तलवाडा १५० मंगळवारी विक्र मगड १९३ तर तलवडा १८५ मिमी पावसाची नोंद झाली.
सोमवारी साखरा पुलावरून पाणी वाहू लागल्याने विक्रमगड आणि जव्हारचा संपर्क काही काळ तुटला होता. तसेच विक्र मगड-डहाणू रस्त्यावरील तांबाडी नदीवरील छोटे-मोठे पूल काही तास पाण्याखाली गेले होते.
तालुक्यातील देहर्जे नदीवरील पुल पाण्याखाली गेल्याने कुंर्झे भागाशी संपर्क तुटला होता. विक्रमगड-मनोर मार्गावरील चिंचघर येथील पुलावर गाडयांच्या रांगा २ किमी पर्यंत लागल्या होत्या. या वेळी ९ बस व ४० खाजगी वाहने खोळंबली होती. मनोर-विक्रमगड रस्त्यावरील भोपोली येथील पूल ही पाण्याखाली गेला होता. तसेच दिवसभर जनजीवन विस्कळीत झाले होते. विजेच्या गडगडाटासह पडणाºया पावसाच्या सोबतीला सोसाट्याचा वाराही असल्याने परिसरामध्ये विजेचा खेळखंडोबा सुरु होता. त्यातच काहीच्या नळाला गढूळ पाणी आल्याच्या तक्रारी होत्या. या पावसाचा मोठा फटका जनजीवनालाही बसला. विद्यार्थी, चाकरमानी यांचेही हाल झाले.
नैसर्गिक नाले बुजल्याने वसईत पूरस्थिती
पारोळ : वसई तालुक्यात दोन दिवस पडलेल्या पावसाने पूरस्थिती निर्माण करुन जनजीवन विस्कळीत केले. वसई, विरार नालासोपारा भागातील मार्गाना या पावसामुळे नदीचे रुप आले होते. त्यातून वाट काढतांनाच सोमवारी प्रकाश पाटील याचा जीव गेला होता. वसईमध्ये केवळ १७५ मिमी पाऊस पडला असतानाही या परिसराला जलाशयाचे रूप का आले. पाऊस पडताच ही परिस्थिती तीन चार वर्षांपासूनच का निर्माण होते? याचे कारण म्हणजे अतिक्रमण करून बुजविले गेलेले नैसर्गिक नाले हे आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा करणाºया नैसर्गिक नाल्यांवर भराव टाकून बांधकाम केल्याने पाण्याचा निचरा न झाल्याने वसई, विरार, नालासोपारा, पेल्हार, नवजीवन, वालीव, धानिव, चंदनसार, गोखिवरे, वसई फाटा, सोपारा फाटा, विरार फाटा, बावखल, सातीवली हा परिसर पाण्याखाली गेला. अनेक घरात पाणी घुसले. ससुपाडा येथे मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाणी आल्याने वाहने चालवणे कठीण झाले. अनेक वाहने बंद पडली त्यामुळे वाहतूककोंडी झाली. अनेक शाळांना सुट्टी देण्यात आली तर चाकरमान्यांनी कामावर न जाणे पसंत केले.
वसईला लगत तुंगारेश्वर अभायारण्याचा डोंगर, विरारमधील जीवदानी मातेचा डोंगर असल्यामुळे त्या डोंगरावरील पावसाचे पाणी नैसर्गिक नाल्यातून समुद्राला मिळत असे. परंतु या भागाचे शहरीकरण होत असल्याने जागेच्या हव्यासा पोटी, भूमाफियानी नैसर्गिक नाल्यांवर अवैध बांधकाम केल्याने ते साठल्याने वसई विरार परिसराला नदीचे रूप आले होते.