श्वानाला मारहाण, गुन्हा दाखल, व्हिडीओ सोशल मिडियावर झाली व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 04:25 AM2019-02-20T04:25:28+5:302019-02-20T04:25:40+5:30
घटना सीसीटीव्हीत चित्रित : सोशल मिडियावर झाली व्हायरल
बोर्डी : या शहरातील जनार्दन आर्केड इमारतीच्या आवारात बसलेल्या श्वानाला लगतच्या जलसा कॅफेचे विशाल वाडेकर यांनी बेदम मारहाण केल्या प्रकरणी त्यांच्या विरु द्ध कारवाई करण्याची मागणी सजग नागरिकांनी केली आहे. ही घटना सिसिटीव्हीत कैद झाल्यानंतर सोशलमीडियावर क्लिप व्हायरल झाल्यानंतर कारवाईची मागणी तीव्र झाली.
शुक्रवार १५ फेब्रुवारीच्या दुपारी या इमारतीच्या आवारात एक श्वान बसला होता. त्यावेळी लगतच्या जलसा कॅफेचे विशाल वाडेकर याने तेथे येऊन त्याला दंडुक्याने मारहाण केली. या जीवघेण्या हल्ल्याने श्वान विव्हळू लागला. मात्र हे पाहून वाडेकरला पुन्हा जोश आला. काही पावले माघारी जाऊन त्याने पुन्हा त्याच्याकडे मोर्चा वळवून जोरदार पाच प्रहार केले. त्यावेळी अन्य व्यक्तीने येऊन त्याला थांबविण्याचा प्रयत्नही केला. अन्यथा जीव घेतला गेला असता. ही संधी साधून जीव मुठीत घेऊन जखमी श्वानाने तेथून पळ काढला. हा प्रकार सिसिटीव्हीत रेकॉर्ड झाला असून त्याची क्लिप सोशलमीडियावर फिरू लागली. त्यामुळे वाडेकर यांच्या असंवेदनशील वर्तणूकीबद्दल टीकेची झोड उठली. त्यानंतर शॅरन नाजमी (राहणार, कंक्र ाडी) आणि विवेक जयाल (केटीनगर) यांनी वाडेकर विरुद्ध कारवाई करण्याबाबत लेखी निवेदन डहाणू पोलीस ठाण्यात दिले आहे. दरम्यान नागरिकांच्या भावना तीव्र झाल्याचे कळताच वाडेकरने तत्काळ सोशलमीडियाचा आधार घेत घडलेल्या कृत्याबद्दल सार्वजनिक माफी मागितली. हा भटका कुत्रा वारंवार कॅफेत शिरत असल्याने राग अनावर झाल्याने हा प्रकार घडल्याचा उल्लेख त्याने केला आहे.
याबाबत कारवाई करण्यासाठी लिखित निवेदन प्राप्त झाले आहे. जखमी श्वान आढळल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
-जनार्दन परबकर,
पोलीस निरीक्षक,
डहाणू पोलीस ठाणे