विक्रमगडमध्ये उन्हाळी भात पीक कापणीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 07:02 AM2020-05-20T07:02:01+5:302020-05-20T07:02:25+5:30
आता उन्हाळी भात पीक तयार झाले असून त्याच्या कापणीला सुरुवात झाली आहे. मात्र, कोरोना प्रादुर्भावाच्या भीतीमुळे मजूर मिळेनासे झाले आहेत.
- राहुल वाडेकर
विक्रमगड : विक्रमगड तालुक्यात सिंचनाच्या विशेष सुविधा उपलब्ध नसतानाही खरिपात तर भात लागवड होतेच; परंतु उन्हाळी हंगामातसुद्धा मुहू खुर्द लघु पाटबंधारा व खांड लघु पाटबंधाऱ्याच्या पाटाच्या पाण्यावर सजन, झडपोली, खांड गावात भात पिकाची लागवड करून येथील प्रयोगशील शेतकरी भाताचे उत्पादन घेत आहेत. आता उन्हाळी भात पीक तयार झाले असून त्याच्या कापणीला सुरुवात झाली आहे. मात्र, कोरोना प्रादुर्भावाच्या भीतीमुळे मजूर मिळेनासे झाले आहेत. यामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांनी ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळून भात कापणीला सुरुवात केली आहे.
यावर्षी तालुक्यात अवकाळी पावसाने भात पिकाची पुरती वाट लावली. भात पीक तयार होण्याच्याच काळात पाऊस पडल्याने पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे तालुक्यातील शेतकºयांचे भात पिकाचे ५० टक्के उत्पन्न घटल्याने लागवडीचा खर्चही निघाला नाही. पीक कर्ज कसे फेडायचे या चिंतेत असतानाच आपले मनोबल खचू न देता पुन्हा उभारी घेत झडपोली, सजन गावातील शेतकºयांनी उन्हाळी भातशेतीची लागवड केली. या वर्षी उन्हाळी भात पिकात तरी आपला खर्च भरून निघेल या आशेवर शेतकरी आहेत.
यंदा उन्हाळी भात पीक थोड्या फार प्रमाणात चांगले आले आहे. झडपोली, सजन गावातील प्रयोगशील शेतकरी सेवक सांबरे, अंकुश सांबरे, नरेश सांबरे, शरद सांबरे, श्रीधर सांबरे, सुभाष सांबरे, रमेश सांबरे, नारायण सांबरे, मधुकर सांबरे अशा अनेक शेतकºयांनी आपल्या शेतात उन्हाळी हंगामात भाताचे पीक घेतले. त्यासाठी त्यांनी भात लागवडीच्या वर्षानुवर्षे अनुभवाच्या जोरावर शेतात सुधारित पद्धतीने अंदाजे २५ ते ३० हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची रोवणी केली आहे. आता भात पीक कापणीस आले आहे.
या भागातील शेतकºयांना यंत्राच्या साहाय्याने उन्हाळी भातशेती लागवड प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यांत्रिक पद्धतीने पीक लागवड कशी करतात याचे मार्गदर्शन वेळोवेळी शेतकºयांना कृषी विभागाकडून देण्यात आले.
-प्रभाकर सांबर, कृषी सहायक, सजन
पावसाळी भातशेतीचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे उन्हाळी भातशेतीतून मोठ्या अपेक्षा आहेत. भातशेती कापणीस तयार झाली आहे. मात्र, अचानक आलेल्या कोरोना संसर्गाच्या संकटामुळे भातकापणीसाठी मजूर मिळेनासे झाले आहेत. हाताशी आलेले भात पीक वाया जाऊ नये म्हणून आम्ही शेतकºयांनी कुटुंबाच्या मदतीने सोशल डिस्टन्सिंग पाळत भात पीक कापणीस सुरुवात केली आहे.
- सेवक सांबरे, उन्हाळी भात पीक लागवड केलेले शेतकरी, सजन गाव