सफाई न केल्याने सूर्या कालव्याची कचराकुंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 01:07 AM2020-01-02T01:07:19+5:302020-01-02T01:07:21+5:30
आठवडाभर उशिरा पाणीपुरवठा; दुर्लक्षामुळे सूर्या कालवे रुतले गाळात
- शशिकांत ठाकूर
कासा : डहाणू, पालघर तालुक्यातील गावातील शेतीला उन्हाळ्यात सूर्या कालव्यातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या कालव्यात साठलेला गाळ, दगड - गोटे, गवत, झाडेझुडपे यामुळे कालव्याची अक्षरश: कचराकुंडी झाली आहे. पाच वर्षांत कालव्यांची साफसफाई न केल्याने अशी परिस्थिती झाली आहे. त्यातही सोमवार, ३० डिसेंबर रोजी उशिरा कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले.
सिंचन या प्रमुख उद्देशाने हे धरण बांधण्यात आले होते. या कालव्यातून १४ हजार ५०० हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली आहे. दरवर्षी १५ डिसेंबरला सूर्या कालव्यातून पाणी सोडले जाते. मात्र चालू वर्षी तब्बल पंधरा दिवस उशिरा डाव्या कालव्यातून ३० डिसेंबरला पाणी सोडण्यात आले आहे तर उजव्या कालव्यातून ते ३१ डिसेंबरला सोडण्यात येणार आहे. त्यामुळे शेतीचा हंगाम लांबणीवर जाणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, मुख्य कालव्यात तसेच उपकालव्यात गाळ, कचरा, गवत, दगडगोटे साचले आहेत. तरीही त्याची सफाई न करता पाणी सोडले आहे. आधीच कालव्याचे प्लास्टर, बांधकाम वाहून गेल्याने दुरवस्था झाली आहे. त्यामुळे कालव्यातून पाण्याचा निचरा होत असल्याने अपुरा पाणीपुरवठा होतो आणि पाणी सोडल्यानंतर आठवडाभरात पाणी शेवटच्या गावापर्यंत पोहचते. मात्र, आता तर कालव्यात मोठ्या प्रमाणावर गाळ आहे आणि दुरवस्था झाली आहे.
दरम्यान, २००९ पासून कालवे दुरुस्ती आणि साफसफाई करण्यास मंजुरी दिली जात नाही तसेच ती हातीही घेतली जात नाही. त्यामुळे गाळ काढण्याची तसेच साफसफाईची कामे यांत्रिकी विभागामार्फत केली जात असल्याचे जलसंपदा विभागाचे अधिकारी सांगतात.
आदिवासी भागातील डहाणू, पालघर आणि विक्रमगड आदी तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा केला जातो. यामध्ये डहाणूतील पेठ, तवा, धामटने, कोल्हान, कासा, सूर्यनगर, वेती, वरोती, मुरबाड, वांगर्जे, उर्से, सारणी, म्हसाड, आंबिवली, साये, आंबिस्ते, सोनाळे, वाघाडी, ऐना, साखरे तर पालघरमधील बºहाणपूर, आंबेदा, नानीवली, चिंचारे, बोरशेती, अकेगव्हान, रावते, कुकडे, महागाव आदी सुमारे ७० ते ८० गावांना पाणीपुरवठा केला जातो.
निवडणूक प्रशिक्षणासाठी कर्मचारी गेल्याने कालव्यातून उशिरा पाणीपुरवठा झाला असून डाव्या कालव्यातून पाणी सोडले असून ३१ डिसेंबरला उजव्या कालव्यातून पाणी सोडले जाणार आहे.
- प्रवीण भुसारे, उपअभियंता,
सूर्या प्रकल्प वाणगाव शाखा
सूर्या कालव्याची मशिनरीने गाळ काढण्याची कामे सुरू असून बाकी गाळ काढण्याची कामेही केली जातील.
- रवी पवार, कार्यकारी अभियंता, सूर्या प्रकल्प