सूर्या प्रकल्प आजही अपूर्णच, उपकालवे काढले पण पाणी नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 12:52 AM2020-03-05T00:52:28+5:302020-03-05T00:52:34+5:30
डहाणू, पालघर आणि विक्रमगड तालुक्यातील शेकडो गावांमधील शेतीला पाणीपुरवठा करणारा सूर्या प्रकल्प ४० वर्षानंतरही अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे.
शशिकांत ठाकूर
कासा : डहाणू, पालघर आणि विक्रमगड तालुक्यातील शेकडो गावांमधील शेतीला पाणीपुरवठा करणारा सूर्या प्रकल्प ४० वर्षानंतरही अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे. सिंचन या प्रमुख उद्देशाने कासाजवळील धामणी येथे १९७५ मध्ये धरण बांधण्यात आले आणि कालवे काढण्यासाठी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरित करण्यात आल्या. मुख्य कालवे उंचावरून जंगलाच्या बाजूला तयार करण्यात आले तर मुख्य कालव्यातून शेतीला पाणी देण्यासाठी उपकालवे काढण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर जमिनी हस्तांतरीत केल्या. मात्र डाव्या कालव्याची एकूण लांबी ४७ कि.मी. असून ३३ कि.मी. ते ४७ कि.मी. या १४ कि.मी. कामाला वनविभागाने अद्याप परवानगी दिली नसल्याने मुख्य कालवा फक्त बोरशेतीपर्यंत आहे. पुढे वनविभागाची परवानगी नसल्याने कालवा तयार केला नाही. त्यामुळे बोरशेतीच्या पुढील किराट, नागझरी, निहे, चरी, दामखिंड, वेळगाव, लालोंडे, गुंदले, खुंटल, करवेले आदी २६ गावात मुख्य कालव्याचे काम राखडल्याने अद्याप पाणी मिळाले नाही. यापैकी किराट, गुंदले, करवेले, लालोंडे आदी गावातील शेतकºयांच्या जमिनीत शेतीला मुख्य कालव्यातून पाणी पुरवठा करणारे उपकालवे खोदले आहेत. विशेष म्हणजे उपकालवे तयार करून ४० वर्षे झाली. पण अद्याप येथील शेतकºयांना पाणी नाही. आधी हे कच्चे माती भरावाचे होते. पण १० वर्षांपूर्वी पाण्याचा ठावठिकाणा नसताना जलसंपदा विभागाने लाखो रुपयांची कामे करून काही ठिकाणी पक्क्या सिमेंटचे कालवे केले आहेत. परंतु पाणीच नसल्याने ते झाड, झुडपे दगडाने भरले आहेत. बांधकाम तुटून गेली आहेत. त्यामुळे लाखो रु पयांचा सरकारी खर्च पाण्यात गेला आहे.
दरम्यान सिंचन हा प्रमुख उद्देश असताना अजून डाव्या कालव्याची २६ गावे आणि वाणगाव पूर्वेस पाणी मिळालेले नाही. सूर्या प्रकल्प अपूर्ण असताना पाईपलाईन करून विरार, वसई, तारापूर औद्योगिक क्षेत्रात सूर्याचे पाणी नेण्याचे काम सुरू आहे.
>सूर्या प्रकल्प अपूर्ण आहे. आमच्या भागात शेतीला पाणीपुरवठा करणारे उपकालवे खोदले आहेत, पण पाणीच नाही. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा खर्च वाया गेला असून हे उपकालवे फक्त शोभेसाठी आहेत.
- अविनाश पाटील, कुणबी सेना तालुका प्रमुख
सिंचन या प्रमुख उद्देशाने धरण बांधले आहे. त्यामुळे लाभ क्षेत्रातील सर्वच शेतकºयांना हक्काचे पाणी मिळाले पाहिजे, त्याशिवाय बाहेर दिले जाऊ नये. - विजय वझे, शेतकरी
वन विभागाची परवानगी नसल्याने कालव्याचे काम थांबले होते. सदर परवानगी प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून वनविभागाची परवानगी मिळताच कालव्याच्या कामास सुरु वात करून सिंचनाचा लाभ शेतकºयांना दिला जाईल. - रवी पवार, कार्यकारी अभियंता, सूर्या प्रकल्प