वसईतील सनसिटी -गास रस्ता पाण्याखाली; 'या' पाण्यातून वाहने नेऊ नयेत; पालिका, पोलीस यांचे आवाहन !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 04:56 PM2020-08-06T16:56:33+5:302020-08-06T16:56:37+5:30
शहरातील वाहनचालक, नागरीक यांची सुरक्षितता पाहता येथे पाणी ओसरे पर्यंत प्रवेश बंद करण्यात आला असल्याची माहिती माणिकपूर पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी लोकमत ला दिली आहे.
वसईः मागील चार दिवसापासून सतत सुरू असलेल्या वसई-विरार मधीलअतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यातच वसईच्या कमी अधिक भागात पाण्याचा निचरा झाला असला तरी अजूनही अनेक सखल भागात गुडघाभर तरी पाणी असल्याचे चित्र आहे. त्यातच वसईतील सनसिटी येथील संपूर्ण सनसिटी-गास हा मुख्य रस्ताच पाण्याखाली गेला असल्याने या रस्त्यावरून जाऊन कुठलाही अपघात होऊ नये याकरिता शहरातील वाहनचालक, नागरीक यांची सुरक्षितता पाहता येथे पाणी ओसरे पर्यंत प्रवेश बंद करण्यात आला असल्याची माहिती माणिकपूर पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी लोकमत ला दिली आहे.
या सनसिटी- गास रस्त्याचा वापर नालासोपारा, भुईगाव, निर्मळ, गास, विरार पासून अनेक नागरिक नियमित करतात. वसई रेल्वे स्थानक या रस्त्याने काही वेळातच गाठता येते. सनसिटी, चुळणे रस्त्यावर बाजूलाच लागून संपूर्ण खाडी क्षेत्र असल्याने खास करून पावसाळ्यात समुद्रात भरती आली की हे पाणी सुध्दा या गासच्या रस्त्यावर येते आणि इथला संपूर्ण मार्गच बंद होतो आणि दरवर्षीप्रमाणे पालिका, वाहतूक व स्थानिक पोलीस आवाहन करतात की, या पाण्यातून वाहने नेण्याचे धाडस करू नये, तसे फलकही लावले जातात, एकंदरीत नागरिकांची गैरसोय होते, एकूणच आता या रस्त्यावर खूप पाणी साचून आहे,आणि त्यामुळे नागरिकांना वसई गाव अथवा देवतलाव असा दुहेरी वळसा घेत निर्मळ मार्गे नालासोपारा अथवा पुन्हा वसईत येण्यासाठी लांब पल्ल्याचा प्रवास करून शेवटी घर गाठावे लागते आहे.