संडे झाला क्यू डे! बँकाही झाल्या त्रस्त!
By admin | Published: November 14, 2016 03:51 AM2016-11-14T03:51:05+5:302016-11-14T03:51:05+5:30
रविवारी सुट्टी असली तरी हजारो वसईकर सकाळपासूनच बँकांपुढे रांगा लावून उभे राहिले होते. आजही वसईतील निम्म्याहून अधिक एटीएम मशिन बंद होते.
वसई : रविवारी सुट्टी असली तरी हजारो वसईकर सकाळपासूनच बँकांपुढे रांगा लावून उभे राहिले होते. आजही वसईतील निम्म्याहून अधिक एटीएम मशिन बंद होते. बँकेतून धिम्या गतीने कारभार होत असल्याने चार हजार रुपयांसाठी दोन-अडीच तास ताटकळत उभे रहावे लागत असल्याने लोकांचा संताप हळूहळू बाहेर पडू लागला आहे.
एरव्ही रविवारी सुट्टी असल्याने उशिरार्पंत अंथरुणात लोळत पडणारे वसईकर सकाळी लवकरच बँकांपुढे रांगा लावून उभे होते. सोमवारी बँकांना सुुट्टी असल्याने गैरसोय टाळण्यासाठी बँकांपुढे मोठी गर्दी उसळलेली दिसत होती. बँकांमध्ये पुरेसे पैसे नसल्याने गेल्या तीन दिवसांपासून गैरसोय होऊ लागली आहे. त्यातच फक्त दोन हजार रुपयांच्या नोटा दिल्या जात आहेत. पण, बाजारात सुट्या पैशांची चणचण जाणवू लागली असल्याने नवी डोकेदुखी निर्माण झाली आहे. त्यामुळे लोक संतापले आहेत. (प्रतिनिधी)
वाड्यात वाढल्यात रांगा-
वाडा : तालुक्यातील सर्वच बँकांमध्ये पैसे काढणे व पैसे भरण्यासाठी एकच रांग असल्याने सर्वच बँकांमध्ये नागरिकांच्या लांबच लांब रांगा होत्या.
बँकेत फक्त ५००-१००० च्या नोटा भरणा होतात १००-५०-२० या नोटांची टंचाई होत असल्याने अनेक बँकामध्ये नागरिकांना २००० च्या नविन नोटा देण्यात येत होत्या मात्र बाजारात सुट्टे पैसे मिळत नसल्याने नागरिक त्या स्विकारत नव्हते. बँकासमोर सकाळी ८.३० वाजल्यापासून लांबच लांब रांगा गाल्या होत्या. पैसे जमा करणे, पैसे काढण्याकरीता तासनतास ताटकळत उभे रहावे लागत होते. तालुक्यातील सर्वच बँकांचे एटीएम बंद असल्याने नागरिकांची बँकामध्ये एकच गर्दी झाली होती त्यामुळे वाड्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. तर नागरिकांना संघर्ष करावा लागत असून बँकामध्ये पैसे भरणे व काढण्यासाठी गर्दी व धक्काबुक्की सहन करावी लागली. (वार्ताहर)
स्टेट बँकेत खडखडाट -
जव्हार : चलन बदलाचा फटका नागरिकांना चांगलाच बसला. चौथ्या दिवशीही जव्हारच्या सर्वच बँकांत भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यात चार एटीएम बंद आणि स्टेट बँकेतीलही रक्कम संपल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली.
जव्हार तालुक्याच्या ठिकाणी भारतील स्टेट बँक, हैद्राबाद बँक, जव्हार अर्बन बँक, ठाणे मध्यवर्ती बँक, एचडीएफसी बँक, अशा येथे पाच बँका आहेत.
मात्र या यापैकी चार बँकांची एटीएम बंद असल्याने, नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. स्टेट बँकेचे एटीएम चालू होते. त्यामुळे तेथे पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकांची लांबच-लांब रांग लागली होती.
मात्र बँक आणि एटीएम यातील पैसे संपल्याने गोंधळ उडाला. शेवटी एटीएममध्ये पुन्हा पैसे भरले जाई पर्यंत शेकडोंना प्रतिक्षा करावी लागली. भारतीय स्टेट बँकेतच फक्त चलन बदलवून मिळत असल्याने, याच बँकेत मोठी गर्दी दिसत होती. इतर बँकांना फक्त जुने चलन भरणे चालू होते. रविवार असल्याने आज रांगांची लांबी वाढली होती.(वार्ताहर)