सूर्यफूल शेती ठरतेय शेतकऱ्यांना वरदान, पालघरमध्ये बळीराजाचा प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 09:51 AM2023-04-24T09:51:00+5:302023-04-24T09:51:57+5:30
पालघरमधील प्रगतशील शेतकऱ्यांनी धरली आधुनिकतेची कास
लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : पालघर जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरत सूर्यफूल लागवड करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये जव्हार, विक्रमगड, पालघर व डहाणू तालुक्यातील शेतकरी हा प्रयोग साधत आहेत. याकरिता ‘बायफ’ म्हणजेच भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाऊंडेशनकडून मोलाचे मार्गदर्शन लाभत असून, शेतकऱ्यांना तीन महिन्यात प्रत्येकी पाच हजार रुपयांपर्यंत उत्पादन मिळाले आहे.
आदिवासी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी ‘बायफ’ विविध पद्धतीने काम करते व कार्यक्रम राबवते. याच कार्यक्रमांचा एक उपक्रम म्हणून २०० हून अधिक शेतकऱ्यांंना प्रत्येकी सात गुंठेेकरिता ५०० ग्रॅम बियाणे देऊन मार्गदर्शन केले. त्यात सूर्यफूल, मोहरी, करडई, तीळ यांसारख्या तेलबियांचे उत्पादन मुख्य वा मिश्र पिके घेण्यास सुरुवात केली आहे. भात कापणीनंतर शेतातील उरलेल्या ओलाव्यावर पिके घेण्यास मोठा वाव आहे. परिसंस्थेच्या, जैवविविधता संवर्धनाच्या दृष्टिकोनातून मोहरी, करडई आणि सूर्यफूल यांसारख्या तेलबिया, जमिनीत असलेल्या ओलाव्यावर पेरणी किंवा टोकन पद्धतीने भाजीपाला पिकांमध्ये आंतर पीक म्हणून घेतले जात आहे.
सूर्यफूल हे हिवाळी व उन्हाळी या दोन्ही हंगामात घेता येऊ शकते. कापणीपर्यंत थोड्या - अधिक प्रमाणात सिंचनाची आवश्यकता असते. आदिवासी शेतकऱ्यांनी रस घेऊन तेलबियांची काळजीपूर्वक लागवड केली. एकात्मिक कीड व्यवस्थापनामुळे कीड नियंत्रणात आणि शेतातील फायदेशीर कीटक वाढण्यास मदत होते. रासायनिक कीटकनाशकावर होणारा खर्चही कमी होऊ शकतो. पालघर, जव्हार, विक्रमगड आणि डहाणू तालुक्यातील शेतकरी या पद्धतीचा उपयोग करत आहेत. ‘महाराष्ट्र बायफ’चे मुख्य कार्यक्रम अधिकारी सुधीर वागळे यांच्या मार्गदर्शनाखाली, विनोद बोरसे, किरण भागडे, पंकज परदेशी, संतोष आगळे, नितीन भोये या ‘बायफ’च्या जव्हारमधील टीममार्फत अंमलबजावणी झाली.
२०० शेतकऱ्यांच्या शेतात प्रयोग
२०० शेतकऱ्यांना सात गुंठे जागेत ५०० ग्रॅम बियाणे देण्यात आले. तीन महिन्यात उत्पन्न येत प्रत्येकी ५० किलोग्रॅम तेलबियांचे उत्पन्न निघाले. त्या तेलबियांतून प्रत्येक शेतकऱ्याने तेल काढल्यानंतर २५ किलो सूर्यफुलाचे तेल उत्पादित झाले. प्रत्येकी २०० रुपये किलोच्या हिशोबाने प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येकी पाच हजार रुपये मिळाल्याने ‘बायफ’कडून एक चांगला प्रयोग यशस्वी झाला.