‘सूर्या’चे १०० एमएलडी पाणी एप्रिलपासून
By admin | Published: March 31, 2017 05:35 AM2017-03-31T05:35:09+5:302017-03-31T05:35:09+5:30
वसई विरारच्या पाणी टंचाईवर मात करणाऱ्या सूर्या टप्पा तीनचे काम अंतिम टप्यात असून एप्रिलपासून दररोज शंभर एमएलडी
शशी करपे / वसई
वसई विरारच्या पाणी टंचाईवर मात करणाऱ्या सूर्या टप्पा तीनचे काम अंतिम टप्यात असून एप्रिलपासून दररोज शंभर एमएलडी अतिरिक्त पाणी पुरवठा सुुरु होईल अशी ग्वाही महापालिकेने दिली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही योजना विविध अडथळयांची शर्यत पार करीत अंतिम टप्यात पोहचली असतांनाच ७० मीटर लांबीच्या दगडाचा अडसर काही दिवसात दूर झाल्यानंतर वसई विरारसह ६९ गावांना पाणी पुरवठा होणार आहे.
सध्या वसई विरार शहराला उसगाव, पेल्हार, पापडखिंड आणि सूर्यातून दररोज १३१ एमएलडी पाणी पुरवठा होत आहे. सध्याची लोकसंख्या लक्षात घेता वसई विरारला आणखी ९२ एमएमलडी पाण्याची गरज आहे. ती गरज भागवण्यासाठी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सूर्या टप्पा तीन योजनेतून शंभर एमएलडी पाणी पुरवठा योजना मंजुरी करून घेतली होती. नगरोत्थान योजनेतून या योजनेला मंजुरी ंिमळाली असून त्यासाठी २९६ कोटी रुपये खर्च होणार आहेत. यातील १३० कोटी रुपये राज्य सरकारकडून अनुदान मिळणार आहे. या योजनेच्या कामाला २०१४ रोजी सुरुवात करण्यात आली होती. १ मार्च २०१५ पर्यंत योजना पूर्ण होऊन पाणी पुरवठा सुरु होणार होता. मात्र, त्यात अनेक अडथळे आल्याने ही योजना दोन वर्षे रखडून पडली होती.
सुरुवातीली वनखात्याने हरकत घेतल्याने योजनेचे काम सुरु होऊ शकले नाही. वनखात्याच्या १९ किलोमीटरच्या जागेतून जलवाहिन्या जाणार असल्याने आणि त्यावर ११०० झाडे असल्याने आक्षेप घेतला होता. या मोबदल्यात महापालिकेने वनखात्याला पोलादपूर येथे पर्यायी जागा दिली होती. पण, संपूर्ण जागा नावावर झाल्याशिवाय झाडे कापणार नाही अशी भूमिका वनखात्याने त्यानंतर घेतली होती.
झाडे कापण्यासाठी महापालिकेने वनखात्याकडे १ कोटी रुपये जमाही केले होते. पण, अवघा ४० गुंठ्याचा सातबारा नावावर न झाल्याने वनखात्याने खोडा घातला होता. महसूलचा सर्व्हर डाऊन झाल्याने सातबारा नावावर होण्यास विलंब झाला होता. तो नावावर झाल्यानंतर वनखात्याचा अडसर दूर झाला होता.
मध्यंतरी वनखात्याने ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर हरित लवादाने आक्षेप घेतला होता. काही क्षेत्र संरक्षित वनांतर्गत राखीव असल्याने शोभा फडणवीस यांनी हरित लवादाकडे तक्रार केली होती. फडणवीस आणि हरित लवादाचा अडसर दूर करण्यासाठी काही महिने वाया गेले होते. हे अडथळे पार करीत योजना पुढे सरकली आहे. आता काही दिवसांचा कालावधी राहिला असतांनाचा ७० मीटरच्या दगडाने खोडा घातला आहे. मुंबई अहमदाबाद हायवेवर वरई येथे बोगदा खोदून पाईपलाईन टाकण्याचे काम सुुरु असताना त्याठिकाणी ७० मीटरचा दगड लागला आहे. या दगडातून बोगदा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अत्याधुनिक बोगदा तयार करून त्यातून पाईपलाईन टाकली जाणार आहे. त्यासाठी काही दिवस लागतील ही माहिती बविआचे नेते जीतूभाई शहा यांनी दिली.
त्यासाठी महापालिकेचे शहर अभियंता माधव जवादे आपल्या टीमसह याच कामात लागले आहेत. त्यांच्यासोबत बहुजन आघाडीचे नगरसेवक अजीव पाटील, प्रफुल्ल साने यांच्यासह विविध पदाधिकारी त्याठिकाणी ठाण मांडून बसले आहेत.
पालघरच्या विरोधाचे काय
वसई विरार आणि मीरा भाईंदर शहरांना सूर्यातून पाणी देण्यास पालघरमधील सर्वपक्षीयांनी विरोधाचा सूर लावला आहे. त्यासाठी काही पक्ष आणि संघटनांनी एकत्र येऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे. वाढीव शंभर एमएलडी पाणी पुरवठा योजना अंतिम टप्यात आली असतांना आणि प्रत्यक्षात पाणी पुरवठा सुुरु होणार असतानाच पालघरमधून विरोधाचे सूर उमटल्याने कोंडी होणार आहे.
परंतु योजनेतून पाणी पुरवठा सुरळीत होईल, अशी ग्वाही बहुजन विकास आघाडीचे नेते देत आहेत. वसई विरार आणि मीरा भाईंदरला पाणी द्यायला विरोध नाही. त्यासाठी राज्य सरकारने वेगळी धरणे बांधावीत. सूर्यातूनच पाणी दिले जाणार असेल तर मात्र मोठा विरोध होणार. आदिवासी योजनेतून बांधण्यात आलेल्या सूर्याचे पाणी प्रथम सिंचन, आदिवासी आणि पालघर, डहाणू तालुक्याला मिळायला हवे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार आनंद ठाकूर यांनी केली आहे.