पोलीस अधीक्षक राऊत गुरूवारी वसईत
By admin | Published: August 10, 2016 02:30 AM2016-08-10T02:30:31+5:302016-08-10T02:30:31+5:30
वसईतील जनतेच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी पालघर जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षक शारदा राऊत येत्या गुरुवारी वसईत येत आहेत.
वसई : वसईतील जनतेच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी पालघर जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षक शारदा राऊत येत्या गुरुवारी वसईत येत आहेत. अप्पर पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयात राऊत जनतेला भेटणार आहेत.
आयपी सीचे कलम १५४ नुसार तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक दखलपात्र गुन्ह्याची घटना घडल्यावर व त्याची खबर पोलीस स्टेशन मध्ये दिल्यावर, तात्काळ गुन्हा दाखल करून प्रकरण स्टेशन डायरीमध्ये घेणे अधिकाऱ्यावर बंधनकारक आहे. मात्र, वसई तालुक्यातील अनेक पोलीस स्टेशनचे अधिकारी याबाबत आपले कर्तव्य पार पाडत नसल्याचे दिसून येते. तक्रार करावयास गेलेल्यांना थांबा, साहेबांना विचारतो, अर्ज करा, सामनेवाले यांना बोलवून घेतो, चौकशी करतो, अशी उत्तर देऊन गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जाते. याबाबत जनतेच्या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी जनआंदोलन समितीचे कार्यध्यक्ष मिलिंंद खानोलकर व भाजपाचे जेष्ठ नेते शाम पाटकर यांनी संबंधित पोलीस स्टेशनसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्याची सुरुवात वसई पोलीस स्टेशन पासून करण्यात येणार होती.
याची दखल शारदा राऊत यांनी घेतली आहे. त्या गुरुवारी सकाळी अकरा वाजता वसईच्या अप्पर पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयात बसून संबंधितांच्या तक्रारी ऐकून घेणार आहेत. (प्रतिनिधी)