दुकाने बंद ठेवून शेतकऱ्यांना पाठिंबा, नालासोपाऱ्यात जबरदस्ती दुकाने बंद करणाऱ्यांना पाेलिसांची समज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 12:42 AM2020-12-09T00:42:18+5:302020-12-09T00:42:38+5:30
Nalasopara News :
नालासोपारा : शेतकऱ्यांच्या विरोधातील कृषी विधेयक रद्द करण्याच्या मागणीवरून शेतकऱ्यांनी मंगळवारी ‘भारत बंद’चे आवाहन केले होते. त्याला समर्थन देत नालासोपारा शहरातील दुकानदारांनी स्वतः सकाळपासून दुकाने बंद ठेवून समर्थन दिले. रस्त्यावरही तुरळक वाहतूक सुरू होती. बंदच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ नये, यासाठी तुळिंज आणि नालासोपारा पोलिसांनी नाक्या-नाक्यावर पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
नालासोपारा पूर्वेकडील परिसरात एरवी दिसणारी गर्दी या बंदमुळे तुरळक प्रमाणात होती. पूर्व आणि पश्चिमेतील ९५ टक्के दुकानदारांनी उत्स्फूर्तपणे बंद ठेवली होती. रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची संख्याही तुरळक होती.
संतोष भवन परिसरात काँग्रेसचे उतावळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हातात पक्षाचे झेंडे घेऊन दुकाने बंद करण्यासाठी जबरदस्ती करत होते, पण दुकानदारांनी त्यांना विरोध केला. तुम्ही सांगू नका, आम्ही दुकाने बंद करणार आहाेत, असे त्यांनी सांगितले. तुळिंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे.बी. सूर्यवंशी पोलीस कर्मचाऱ्यांसह तेथे पोहाेचले. जबरदस्ती करू नका, अन्यथा दुकानदारांनी तक्रार दिल्यास गुन्हे दाखल करू, असा दम दिल्यावर हे कार्यकर्ते निघून गेले, तसेच आचोळे गावाच्या बाजूला असलेल्या परिसरात काँग्रेसचे कार्यकर्ते दुकान बंद करण्यासाठी दम देत असल्याचे तुळिंज पोलिसांना कळल्यावर त्यांनी फोनवरून समज दिल्याचे कळते. नालासोपारा पोलिसांनी एसटी डेपो, सिविक सेंटर, हेगडेवार चौक, हनुमाननगर, श्रीप्रस्था या परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आंदोलनाला शीख बांधवांचा पाठिंबा
वसई : शेतकरी आंदोलनाला वसईतील शीख बांधवांनीही पाठिंबा दिला आहे. वसईच्या अंबाडी रोडवरील गुरुद्वाराजवळ मंगळवारी संध्याकाळी त्यांनी एकत्र येऊन जोरदार निदर्शने करण्यात आली.
दुपारी ४ नंतर हे आंदोलन झाले. या वेळी या गुरुद्वारासमोर ७० ते ८० शीख बंधू व भगिनींनी एकत्र येऊन ‘जय जवान, जय किसान’ आणि ‘किसान एकता जिंदाबाद’ अशा घोषणा देत निदर्शने केली.
बोईसरमध्ये भारत बंदला चांगला प्रतिसाद
बोईसर : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात मंगळवारी अनेक पक्ष व संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला बोईसरमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा व आर्थिक संस्था वगळता हॉटेल व बाजारपेठा बंद होत्या, तर रिक्षाची तुरळक वाहतूक सुरू होती. सकाळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीएम, बविआ, बसपा, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. त्यांनी बोईसर ते चित्रालय बाजारपेठेपर्यंत येऊन घोषणाबाजी केली. बोईसर पोलीस ठाण्याचे ४६ कर्मचारी, ४ अधिकारी, १० पालघर मुख्यालयातील कर्मचारी आणि स्ट्रायकिंग फोर्स तैनात होते. दुपारी ३ नंतर बंद मागे घेण्यात आला, तर तारापूर एमआयडीसीमध्ये बंदचा प्रभाव फारसा दिसला नाही.