शिक्षक दिन : आईच्या पाठिंब्यामुळे शिक्षणाची बिकट वाट झाली सोपी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 12:33 AM2019-09-05T00:33:54+5:302019-09-05T00:33:58+5:30
शेतात काम करणारा मुलगा ते पालघरचा जिल्हाधिकारी, ही भरारी घेणाऱ्या डॉ. कैलास शिंदे यांचे मार्गदर्शक गुरूवर्य कोण?
पालघर : गावापासून दूरवर असलेल्या आपल्या शेतात, पित्याबरोबर राबत असलेल्या एका मुलाला गावातील शिक्षकांनी पाहिले आणि सरळ त्याचा हात पकडून त्याला शाळेत घातले. शिक्षणाच्या सुरू झालेल्या या प्रवासात अशिक्षित असलेली आई भीमबाई, सीए असणारे मामा अंबादास अंतरे, मोठा भाऊ तुकाराम यांच्याकडून मोठी साथ मिळाली. हीच साथ आपल्याला उच्चपदस्थ अशा जिल्हाधिकारी पदापर्यंत घेऊन आल्याचे पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे हे आज अभिमानाने सांगतात. माता-पिता दोघेही शेतकरी असले तरी आई भीमबाई यांनी आपल्या पाचही मुलांना उच्च शिक्षित केले. शिक्षणासाठी त्या भक्कमपणे त्यांच्या पाठिशी उभ्या राहिल्याने त्यांची शिक्षणाची बिकट वाट सुलभ झाली.
२०१७ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याने भाप्रसेवेत त्यांची निवड झाली. हा प्रसंग माझ्या आयुष्यातील दुर्मिळ प्रसंग! एका गरीब शेतकरी कुटुंबातून सुरू झालेला हा प्रवास खरंतर पशुचिकित्सक डॉक्टर पर्यंत थांबायला हवा, हे अनेकांचे मत खोडून काढीत सर्वसामान्यांना न्याय देणाºया या प्रशासकीय सेवेत येण्याचे ध्येय त्याने मनाशी बाळगले. आणि ते साकारही करून दाखवले. सातारा जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर स्वच्छता व शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी ‘समृद्धी पर्व’ कार्यक्रम सुरू केला. २०१८ मध्ये राज्यातील ३६ जिल्ह्यातून सातारा जिल्हापरिषदेला देशभरातून प्रथम क्रमांक मिळवून दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव गुट्रेस ह्यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात पुरस्कार स्वीकारताना जिल्हाधिकारी डॉ.शिंदे
व्यक्तिमत्त्व घडविण्यात शिक्षकांचा हातभार
अहमदनगर जिल्ह्यातील सोनगाव, ता.राहुरी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत आदरणीय सरोदे सरांच्या मार्गदर्शनाखाली मी सुरुवातीला धडे गिरवले. पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी सोनगावच्या रयत शिक्षण संस्थेत दाखल झाल्यानंतर गोपीनाथ कांबळे, ठकसेन पर्वत या शिक्षकांनी योग्य ते मार्गदर्शन केले.
११-१२ वी प्रवरा (लोणी) येथील पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील ज्युनिअर कॉलेज तर पुढचे शिक्षण परळ (मुंबई) च्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात करून १९९४ मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. लोकसेवा आयोगाची परीक्षा दिल्यानंतर मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून रुजू झालो. त्यानंतर ग्रामविकास विभागात अवर सचिव, मुख्यमंत्री सचिवालयात उपसचिव, अशी यशाची शिखरे पादाक्रांत करताना वरिष्ठ अधिकारी डॉ. डांगे यांनी मार्गदर्शक म्हणून भूमिका पार पाडली.
छडीचा तो फटका आजही आठवतो
६ वी इयत्तेत असताना कडाक्याच्या थंडीत घटक चाचणी सुरू होती. वर्गशिक्षक ननावरे सरांनी वर्गातील ६० मुलांना ताकीद देताना जेवढ्या विषयात नापास तेवढे फटके अशी शिक्षा जाहीर केली होती. सर्व मुलांमधून फक्त ३ विद्यार्थी सर्व विषयात उत्तीर्ण झाले. मी हिंदी मध्ये एका मार्कासाठी अनुत्तीर्ण झाल्याने गारठलेल्या थंडीत सरांनी हातावर मारलेला छडीचा एक फटका आजही आठवत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. शिंदे प्रांजळपणे कबूल करतात.