रमजानमध्ये मुस्लिम बांधवांची साथ; रोजे, नमाज पठन घरूनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 02:46 PM2020-04-27T14:46:10+5:302020-04-27T14:51:52+5:30
या महिन्यामध्ये मुस्लिम बांधव हे मशिदीमध्ये एकत्र येऊन नमाज व तरावीह पठण करून अल्लाहकडे दुवा मागतात.
- हुसेन मेमन
मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यास येत्या 25 एप्रिलपासून सुरवात झाली आहे, सोमवारी 3 रोजे पूर्ण झाले असून, जव्हारच्या मुस्लिम बांधवांनी या तीन दिवसात शासनाच्या आदेशाचे पालन करून घरातच रोजे, नमाज पठन करीत आहेत. एन रमजान महिन्यात जव्हार प्रशासनाने अधिक खबरदारी घेत, आठवड्यातून तीनच दिवस जीवनावश्यक वस्तूंची बाजारपेठ सुरू राहतील असे आदेश काढले असल्याने रोज किराणा व इतर समान खरेदी करून किरकोळ बाजारपेठ खरेदीदारांना अडचण निर्माण झाली आहे, तरीही नागरिक आदेशाचे पालन करीत असताना दिसत आहेत.
या महिन्यामध्ये मुस्लिम बांधव हे मशिदीमध्ये एकत्र येऊन नमाज व तरावीह पठण करून अल्लाहकडे दुवा मागतात. परंतु सद्य:स्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, कोरोनावर मात करण्यासाठी यावर्षी पवित्र रमजान महिन्यातील नमाज पठण हे मुस्लिम बांधवांनी सुन्नी जामा मशीद अथवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन न करता घरामध्येच नमाजपठण करून शासन व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जव्हार सुन्नी मुस्लिम मस्जिद मार्केट ट्रस्ट चे अध्यक्ष अलताफ गुलामहुसेन शेख यांनी मुस्लिम बांधवांना केले आहे.
मुस्लीम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याला चंद्र दर्शनानंतर दि 25 एप्रिलपासून प्रारंभ झाले आहे, एप्रिल आणि मे महिन्याच्या कडक उन्हात येणारे हे रोजे रोजेदारांची चांगलीच कसोटी पाहणारे ठरणार आहेत. एरवी रमजानचा महिना म्हटलं की प्रार्थनांचा महिना, पवित्र महिना, पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांची गर्दी व उत्साह दिसून येतो. यंदा लॉकडाऊनमुळे प्रथमच रमजानच्या महिन्यात मशिदीही सुन्यासुन्या दिसत आहेत. रोजा (निर्जल उपवास) मध्ये तब्बल १४ तास अन्नपाण्यावाचून राहावे लागते. ऋतू कोणताही असो मुस्लीम समाजातील सात वर्षाच्या मुलांपासून आबालवृद्ध रोजे धरतात.
सध्या पालघर जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या वाढत असून, यामध्ये आत्तापर्यंत आठ व्यक्ती मृत पावल्या असल्याने पालघर जिल्ह्यासाठी कोरोना हा गंभीर विषय झाला आहे. त्यामुळे शासनाने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या सुरू असलेल्या लॉकडाउन परिस्थितीत ज्याप्रमाणे सामाजिक विलगीकरणाचे पालन करण्याबाबत राज्य शासनाने सूचना दिलेल्या आहेत, त्याचे पालन पवित्र रमजान महिन्यामध्ये देखील कटाक्षाने करावे. कोणत्याही परिस्थितीत मशिदीमध्ये नमाज पठणासाठी एकत्र येऊ नये. घराच्या अथवा इमारतीच्या छतावर एकत्र येऊन नमाजपठण करण्यात येऊ नये, मोकळ्या मैदानावर एकत्र जमून नमाजपठण करू नये, सामाजिक, धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रम नागरिकांनी एकत्रित करू नयेत.
जव्हारच्या मुस्लिम बांधवांनी त्यांच्या घरात नियमित नमाजपठण व धार्मिक कार्यक्रम पार पाडावेत. तसेच शासनातर्फे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत तमाम मुस्लिम बांधवांनी संचारबंदी व जमावबंदीच्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे, अशा सक्त सूचना तमाम मुस्लिम बांधवांना जव्हार सुन्नि मुस्लिम मस्जिद मार्केट ट्रस्ट तर्फे देण्यात आल्या आहेत.
कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. यामुळे मुस्लीम बांधवांनी रमजानचे रोजे ठेवून घरातच नमाज पार पाडावी व प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच संपूर्ण देशातून या महामारीचा लवकरच नायनाट व्हावा, म्हणून सर्वांनी या महिन्यात विशेष दुआ करावी.
-आप्पासाहेब लेंगरे, पोलीस निरीक्षक, जव्हार.
मुस्लीम बांधवांच्या रमजान महिन्याची सुरुवात २५ एप्रिलपासून होणार आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. कोरोनाच्या संसर्गाचा प्रसार होऊ नये व लॉकडाऊनमधील सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.
-संतोष शिंदे, तहसीलदार, जव्हार.