नवीन वर्षात बळीराजाला भातखरेदी केंद्राचा आधार; शेतकऱ्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 01:09 AM2020-01-02T01:09:20+5:302020-01-02T01:09:23+5:30
क्विंटलमागे दर तसेच बोनसमध्येही होणार वाढ; जिल्ह्यात २९ केंद्रांची व्यवस्था
- सुनिल घरत
पारोळ : सरत्या वर्षी अस्मानी संकटाने कोलमडलेल्या बळीराजाला येणारे नवीन वर्ष हे शुभ संकेत देणारे ठरणार आहे. यंदा आधारभूत भात खरेदी केंद्रावर क्विंटल मागे दरात आणि देण्यात येणाºया बोनसमध्ये वाढ झाल्याने यंदा ही दरवाढ बळीराजाला दिलासा देणारी आहे.
गेल्यावर्षी क्विंटलमागे १७५० आणि बोनस २०० रुपये असा शासनाचा भाताला हमीभाव होता. पण यंदा दरात वाढ होत १८५० तसेच बोनस ५०० असा दर लागू झाल्याने शेतकरी बांधवांसाठी ही आनंदवार्ता आहे.
भात पीक घेणे आता शेतकऱ्यांसाठी महागडे ठरत असून बी बियाणे, खते, औषधे, मजुरी, ट्रॅक्टरचे वाढणारे दर, निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकºयांना भात पीक घेणे परवडत नाही. काही शेतकरी दागिने गहाण ठेवतात तर काही सेवा सोसायटीचे कर्ज घेऊन भात पिकांची लागवड करतात. पीक लागवडीचा खर्च वजा केला असता त्यांच्या हातात काहीच उरत नाही. जर हे भात व्यापारी वर्गाला विकले तर त्यांचा दर हा क्विंटलमागे १२०० ते १५०० असा आहे. त्यामुळे व्यापारी वर्ग शेतकºयांची मोठी पिळवणूक करतो. मात्र, आता ही आधारभूत खरेदी केंद्रे शेतकरी वर्गाला मोठी आधार देणारी ठरणार असून शासनाने केलेली दरवाढ ही येणाºया नववर्षाची भेट आहे.
धान विक्रीसाठी ७/१२ उतारा, गाव नमुना ‘८ अ’ ची मूळप्रत, शेतकºयांचे बँकेतील खाते पुस्तक, आधारकार्ड, ही कागदपत्रे शेतकºयांना आधारभूत खरेदी केंद्रावर दाखवावी लागणार असून भात खरेदी केल्यानंतर काही दिवसातच शेतकºयांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील आणि बोनसही वेगळा मिळेल.
पालघर जिल्ह्यात वाडा, पालघर, विक्रमगड, डहाणू, वसई आणि तलासरी या तालुक्यात ७५ हजार हेक्टरवर भात पीक घेतले जाते. यंदा जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसामुळे शेतातील पीक आणि तण वाया गेले. नुकसान मोठे पण भरपाई तुटपुंजी मिळाली.
त्यामुळे तयार झालेल्या भात पिकाला योग्य दर मिळावा यासाठी जिल्ह्यात भात खरेदी केंद्रे सुरू करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली होती. त्यानुसार राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित प्रादेशिक कार्यालय, जव्हार अंतर्गत जिल्ह्यात आधारभूत खरेदी योजना केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
केंद्रे ठरणार शेतकºयांसाठी आधार
जव्हार तालुक्यात २, विक्रमगड तालुक्यात ५, मोखाडा तालुक्यात ४, वाडा तालुक्यात ८, डहाणू तालुक्यात ४, तलासरी तालुक्यात २, पालघर तालुक्यात २, वसई तालुक्यात २ अशी पालघर जिल्ह्यात एकूण २९ आधारभूत खरेदी केंद्रे उभारण्यात आली आहेत. ही आधारभूत खरेदी केंद्रे शेतकरी वर्गाला मोठी आधार देणारी ठरणार असून शासनाने केलेली दरवाढ ही येणाºया नववर्षाची भेट आहे.