यकृतावर अवघड शस्त्रक्रिया यशस्वी; तात्काळ उपचार केल्याने मृत्यूवर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 11:48 PM2019-07-03T23:48:29+5:302019-07-03T23:55:27+5:30
यकृतावाटे रक्त गेल्यामुळे त्यांचे रक्त पातळ झाले होते.
नालासोपारा : विरार येथील एका बाइकस्वाराच्या यकृतावर तात्काळ शस्त्रक्रिया झाल्याने त्याचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.
विरार येथे राहणाऱ्या वेदांत भट (२१) फार्मसीच्या दुसºया वर्षाला असून परीक्षा जवळ आल्याने नोट्स आणि अभ्यासक्रमाच्या झेरॉक्स काढण्यासाठी तो बाहेर पडला होता. दुचाकी ६० ते ७० वेगाने चालवत असताना अचानक त्याची बाइक एका खड्ड्यातून उसळली व तो दुभाजकावर जाऊन आदळला. त्याच्या डोक्यावर हेल्मेट असल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली नाही. परंतु त्याच्या पोटाला मार बसला. स्थानिकांनी तात्काळ त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले, परंतु त्याचा रक्तदाब कमी झाल्याने तो बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याला मीरारोड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या पोटाला गंभीर मार बसला होता व त्याची चाचणी करण्यासाठी सिटी स्कॅन करण्यात आले असता त्याच्या यकृताला गंभीर जखम झाल्याचे निदान झाले. त्यामुळे त्यातून भरपूर रक्तस्त्राव होत होता. त्यामुळे कोणतीही शल्यचिकित्सा करणे फार जोखमीचे होते.
होणारा रक्तस्त्राव थांबविणे हे एक वैद्यकीय आव्हान असते. रक्तस्त्राव थांबविण्यासाठी ३ दिवस यकृतावर मॉप्स ठेवले व तीन दिवस कोणतीही शस्त्रक्रिया केली नाही. या तीन दिवसात त्याचे पोट बंद केले नव्हते, तीन दिवसानंतर जेव्हा रक्तस्त्राव थांबला तेव्हा यकृतावर शस्त्रक्रिया सुरु केली. यावेळी त्याला १५ ते २० युनिट रक्त देण्यात आले. यामध्ये ब्लड सेल-प्लाझमा याचाही समावेश होता. यकृतावाटे रक्त गेल्यामुळे त्यांचे रक्त पातळ झाले होते. त्यामुळे अशा रुग्णावर दुसरी शस्त्रक्रिया ही वैद्यकीय क्षेत्रात फारच दुर्मिळ घटना मानली जाते.
जखमींना तात्काळ मदत
आजमितीला भारतामध्ये रस्ते दुर्घटनांमध्ये रोज दोन हजार बाइकस्वारांचा अपघात होत असून अनेकवेळा गंभीर दुखापत झाल्यामुळे अनेकांचा मृत्यू होतो तर अनेकजण कायमचे जायबंदी होतात. वेदांतला मिळालेल्या तात्कळ मदतीमुळे त्यांचे प्राण वाचविण्यात आम्हाला यश मिळाले आहे, अशी माहिती त्याच्यावर उपचार करणाºया डॉक्टरांनी दिली.