सर्जिकल स्ट्राईक हे शंभर टक्के सत्य - कर्नल रायकर
By admin | Published: May 3, 2017 05:08 AM2017-05-03T05:08:56+5:302017-05-03T05:08:56+5:30
सर्जिकल स्ट्राईक हे तथ्य आहे त्यात मिथ्य बिलकुल नाही. त्या भोवती मिथकं तयार झाली आहेत. डीजीएमओ नी पत्रकार
विरार : सर्जिकल स्ट्राईक हे तथ्य आहे त्यात मिथ्य बिलकुल नाही. त्या भोवती मिथकं तयार झाली आहेत. डीजीएमओ नी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली हीच एक मोठी खात्री आहे. लष्कराने पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्याची ही पहिलीच वेळ आहे असं प्रतिपादन निवृत्त कर्नल शैलेश रायकर यांनी वसई येथे संजीवनी व्याख्यानमालेत सर्जिकल स्ट्राईक तथ्य की मिथ्य या विषयावर बोलताना केलं.
दहशतवादी केंद्र चालविल्याची कबुली दिल्या सारखे होईल म्हणून पाकिस्तान हे स्ट्राईक्स झाल्याचे नाकारते आहे अशी सुरूवात करून त्यांनी सांगितलं की सर्जिकल हा वैद्यकीय शब्द आहे. जगातील कोणत्याही लष्कराच्या पाठयपुस्तकात सर्जिकल स्ट्राईक असा शब्द नाही. एखादं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कमीत कमी वेळेत व कमीत कमी संसाधन वापरून केलेला हल्ला म्हणजे सर्जिकल स्ट्राईक. रुडयार्ड किपलींगने सागिंतलेल्या सहा प्रश्नांची चौकशी आपल्याला सत्य उलगडायला मदत करेल.
ते सहा प्रश्न म्हणे कोणी ? कधी ? कुठे? काय ? कसं ? आणि का ? चार प्रश्नाची उत्तर आपल्या सर्वांना माहित आहेत, भारतीय सेनेने २९ सप्टेंबर २०१६ ला हॉट्सपिंग या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक केला. भारतीय सेनेने एलओसी पलीकडील पाक सरहद्दीत घुसून ७ दहशतवादी केंद्रे उद्ध्वस्त केली. योजना अंमलात आणताना काय काय आणि कशी कशी काळजी घेतली जाते हे त्यांनी उदाहरणं देऊन स्पष्ट केलं. सरकारने ठरविले तर दहशतवादी कारवाया थांबण्यासाठी आम्ही काय करू शकतो? याची चुणूक पाकिस्तानला दाखविण्यासाठी हे स्ट्राईक केले गेले. या अगोदरही सर्जिकल स्ट्राईक झाले आहेत. परंतु त्याला प्रसिद्धी दिली गेली नाही उदा. भारतीय सेनेनी २०१५ साली ब्रह्मदेश सरहद्दीवर असे स्ट्राईक्स् केले होते, असे ते म्हणाले. (वार्ताहर)