भूकंपप्रवण क्षेत्रात सर्वेक्षणास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 11:06 PM2019-08-05T23:06:46+5:302019-08-05T23:06:56+5:30
डहाणू, तलासरी परिसर : शंभर कर्मचाऱ्यांचे पथक
डहाणू : डहाणू आणि तलासरी तालुक्यातील गावांना दहा महिन्यांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. २५ जुलै रोजी ३.८ रिश्टर स्केल क्षमतेचा सर्वात मोठा भूकंपाचा धक्का बसल्याने, काही घरांना लहान - मोठे तडे गेले आहेत. भूकंप झालेल्या गावातील शाळा, अंगणवाड्या, ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक आरोग्यकेंद्र, अनुदानित आश्रम शाळा, शासकीय कार्यालये, तसेच गाव पाड्यांतील घरांचे सर्वेक्षण करण्यासाठी, जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, यांनी तलाठी, ग्रामसेवक, शाखा अभियंते, यांच्या नेतृत्वाखालील शंभर सरकारी कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त केले असून, त्यांनी सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात केली असहे. त्यामुळे भुकंपाने नुकसान झालेल्या लोकांना नुकसानभरपाई मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
ज्या भूकंपप्रवण क्षेत्रात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे, त्यांत धुंदलवाडी, सासवंद - तलोठे, चिंचले, नागझरी- मोडगाव, आंबेसरी, गांगणगाव, धामणगाव, बहारे, वंकास, हळदपाडा, मोडगाव, दापचरी, आंबोली, शिसणे, धानिवरी, ओसरवीरा, विवळवेढे, निंबापुर - बांधघर, सायवन, चळणी, वडवली- सवणे, करंजगाव, कवाडा, झरी, वसा, तलासरी (नगरपंचायत), कुरझे, सूत्रकार, उधवा, वेवजी, या ग्रामपंचायतींचा समावेश असून, त्यात ५२ गावांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.
दहा महिन्यांपासून भूकंपाचे धक्के बसत असून, त्यांत आतापर्यंत लहान - मोठे असे सुमारे दोन हजार भूकंपाचे धक्के बसल्याचे जाणवले आहे. या भूकंपप्रवण क्षेत्रात जिल्हा आपत्ती व्यवस्थापनातर्फे सासवंद, गांगोडी, शिसणे, ऐने, धनिवरी, तलासरी, उधवा, कवाडा, येथे भूकंपमापक यंत्र बसवली आहेत.
भूकंपाचे सत्र सुरू होताच, खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफची टीम येथे तब्बल आठ महिने कार्यरत होती. मात्र हे भूकंपसत्र थोडे कमी झाल्याने ती माघारी पाठवण्यात आली. आता पुन्हा या भूकंप प्रवण क्षेत्रातील गावांत जनजागृती करण्यासाठी सिव्हिल डिफेन्सची तुकडी तैनात केली आहे.
तहसीलदारांची माहिती
भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्या वैभवी भुयाळ आणि रिशा मेघवाले यांना शासनामार्फत प्रत्येकी चार लाख अशी मदत देण्यात आली आहे. घरांचे आणि अन्य नुकसान झालेल्या एक हजार ६९ लोकांना प्रत्येकी सहा हजार प्रमाणे एक कोटी १४ हजार रुपयांची मदत दिली.