सर्वेक्षणाने मच्छीमार भिकेला; मासेमारीचे ५६ दिवस जाणार वाया, कवींचीही होणार हानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 12:07 AM2019-01-02T00:07:29+5:302019-01-02T00:08:55+5:30
१ जानेवारी ते २५ फेब्रुवारी पासून समुद्रात ओएनजीसी च्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली. मच्छीमार संघटनांनी दर्शविलेला हा विरोध वरवरचा असल्याचे दिसून येत असून ओएनजीसीचे शेकडो प्लॅटफॉर्म सागरात विहारत आहेत.
- हितेंन नाईक
पालघर : १ जानेवारी ते २५ फेब्रुवारी पासून समुद्रात ओएनजीसी च्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली. मच्छीमार संघटनांनी दर्शविलेला हा विरोध वरवरचा असल्याचे दिसून येत असून ओएनजीसीचे शेकडो प्लॅटफॉर्म सागरात विहारत आहेत. कवीच्या मारलेल्या हजारो खुंटामुळे आधीच मासेमारी क्षेत्र अपुरे पडत असून त्यात या सर्वेक्षणाची भर पडल्याने पालघर, डहाणूतील मच्छीमारांचे कंबरडेच मोडले जाणार आहे. पोलर मर्क्युस या महाकाय जहाजाद्वारे शेअर वॉटर या कंपनीकडून बी ६६ परिसरात ५ नॉटिकल माइल्सच्या गतीने २४ तास समुद्रातील तेल शोध सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आलेली आहे. हे सर्वेक्षण २४ तास कार्यरत असून या जहाजाच्या मागे ६ हजार मीटर्स लांबीच्या ८ ते १० लोखंडी केबल्स समुद्रातील तेलाच्या साठ्यांचा खोलवर शोध घेणार आहेत.
या केबल्स जहाजाच्या पुढे ७ मीटर्स तर मागे ३० मीटर्स पाण्याखाली असणार आहेत. या जहाजाच्या पाठीमागे असणाऱ्या ६ हजार मीटर्स लांबीच्या केबल्स ना लाइट असणाºया टेलबोय लावण्यात आली असून हे जहाज निरंतर चालत राहणार असल्याने व या जहाजाला अचानक वळण घेता येत नसल्याने मच्छीमारांनी आपल्या बोटी आणि जाळ्याना या जहाजाच्या मार्गिकेत न आणण्याच्या सज्जड दम वजा सूचना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. त्यामुळे मच्छीमारांनी आपली मासेमारी थांबवावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या महाकाय जहाजाच्या मार्गिकेत कोणी मच्छीमार येऊ नये म्हणून एक सहाय्यक जहाज, आणि २५ ते ३० गार्ड बोट बंदोबस्ताला ठेवण्यात आल्या आहेत.
या सहाय्यक बोटीवर काही स्थानिक मच्छीमारांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या मार्फत वायरलेस सेटद्वारे सूचना देऊन मासेमारी करणाºया मच्छीमाराना या जहाजाच्या मार्गातून हुसकावून लावण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
समुद्रातील तेल सर्वेक्षणामुळे समुद्रिय पर्यावरणाची मोठी हानी होत असून जैवविविधता नष्ट होऊन माशाच्या अंड्यांवर त्याचा परिणाम होत आहे. प्रत्येक पावसाळ्यात किनारपट्टीवर लागणारे डांबर गोळे हे या तेल सर्वेक्षणा दरम्यान होणाºया उत्खननामुळे होत असल्याचा मच्छीमार संघटनांचा दावा आहे. या जहाजाला लावण्यात येणाºया महाकाय केबल मुळे समुद्रात रोवलेल्या अनेक कवींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून मासेमारीचे तब्बल ५६ दिवसांचे नुकसान होणार आहे.
भरपाईचा वाद पुन्हा उफाळणार
या सततच्या सर्वेक्षणातून होणाºया नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी सन २००० पासून महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती व अन्य संघटनांकडून केली जात आहे. मात्र ओएनजीसी कडून नुकसान भरपाई दिली जात नसल्याचे संघटनांचे म्हणणे आहे, असा यावेळीही हाच वाद नव्याने उफाळून येणार आहे.
सध्या वसई, उत्तन भागातील करल्या डोली द्वारे कव मासेमारी करणाºया मच्छीमारांनी थेट जाफराबाद पर्यंतच्या समुद्रात कवी मारल्याने पालघर, डहाणू मधील मच्छीमारांना आपली जाळी समुद्रात टाकण्यासाठी जागाच उपलब्ध होत नसल्याने मासेमारीची क्षेत्र अपुरे पडत असल्याने हद्दीचा वाद वाढला आहे.
यातच या सर्वेक्षणामुळे काही प्रमाणात मासेमारी साठी उरलेला मोकळ्या भागात आता ओएनजीसीच्या जहाजाकडून जबरदस्तीने सर्वेक्षण होणार असल्याने पालघर, डहाणू तालुक्यातील मच्छीमार व्यवसायाचे आर्थिक कंबरडे मोडले जाणार आहे. त्यामुळे जगावे कसे? हा प्रश्न मच्छीमारांपुढे उभा ठाकला आहे.
मच्छीमाराना विश्वासात घेऊन नंतरच समुद्रात सर्वेक्षण करण्यात यावे यासाठी राम नाईक पेट्रोलियम मंत्री असताना ओएनजीसी विभागात एक समिती नेमण्यात आली होती.मात्र ह्या समितीला विश्वासात घेतले जात नाही त्यामुळे मच्छीमारांना त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळावी.
- नरेंद्र पाटील, अध्यक्ष, एनएफएफ.