सवरांनी केली पाहणी : बोईसर मैदानाचा फैसला आज
By admin | Published: August 10, 2015 11:31 PM2015-08-10T23:31:56+5:302015-08-10T23:31:56+5:30
ओएस ४६/२ या प्लॉटची विक्री प्रक्रिया थांबवून त्वरित तो प्लॉट मैदानाकरिता राखीव ठेवण्यात यावा, या मागणीकरिता मैदान बचाव संघर्ष समितीने विविध राजकीय पक्षांच्या स्थानिक
बोईसर : ओएस ४६/२ या प्लॉटची विक्री प्रक्रिया थांबवून त्वरित तो प्लॉट मैदानाकरिता राखीव ठेवण्यात यावा, या मागणीकरिता मैदान बचाव संघर्ष समितीने विविध राजकीय पक्षांच्या स्थानिक पदाधिकारी व पुढाऱ्यांची मदत घेऊन शासनदरबारी प्रचंड वेगाने हालचाली सुरू केल्या. यामुळे शनिवारी उद्योगमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर सोमवारी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी स्वत: या मैदानावर येऊन त्याची पाहणी केली.
पालकमंत्री चिंचणीच्या पी.एल. श्रॉफ कॉलेजमध्ये एका कार्यक्रमास आले असता पालघर जिल्हा परिषदेचे कृषी सभापती व भाजपाचे नेते अशोक वडे यांनी मैदान बचाव संघर्ष समिती व अन्य पक्षीय नेत्यांबरोबर भेट घडवून चर्चा केली असता सवरा यांनी मी आपल्यासोबत असून जनभावनेच्या विरोधात निर्णय न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर उद्याच चर्चा करून उद्या संध्याकाळपर्यंत आपणास ठोस निर्णय कळवितो, असे आश्वासन उपस्थित शिष्टमंडळाला दिले. दरम्यान, पालघरचे खा. चिंतामण वनगा यांनीही मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन सदर प्लॉट मैदानाकरिता राखीव ठेवावा, अशी मागणी केली आहे.
या शिष्टमंडळात कृषी सभापती अशोक वडे यांच्यासह मनसेचे माजी जिल्हाप्रमुख कुंदन संखे, राष्ट्रवादीचे बोईसर शहराध्यक्ष वैभव संखे, मैदान बचाव समितीचे अध्यक्ष विवेक वडे, बविआघाडीचे तालुका संघटक प्रशांत संखे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सचिन लोखंडे आदी उपस्थित होते.