वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या-धामणी धरणात 32.62 टक्के पाणीसाठा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 07:28 PM2020-06-29T19:28:29+5:302020-06-29T21:24:53+5:30
वसई-विरार शहराला सूर्या-धामणी प्रकल्पातून 100 एमएलडी, सूर्या टप्पा -3 मधून 100 एमएलडी तर उसगाव 20 एमएलडी आणि पेल्हार धरणातून 10 एमएलडी पाणी म्हणजेच एकूण 230 एमएलडी पाणी प्रतिदिन मिळत आहे.
- आशिष राणे
वसई - वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वसई तालुक्यातील दोन धरणा मधील पाणीसाठा खालावला असून जेमे-तेम महिना पुरेल इतकाच पाणीसाठा या धरणात शिल्लक असून पालघर मधील सूर्या-धामणी धरणातील साठा हा मुबलक असल्याने तो बहुतांशी वर्षभर पुरेल अशी आकडेवारी दर्शवणारी स्थिती असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या सहायक अभियंताने लोकमत ला दिली . याउलट उसगाव व पेल्हार मधील पाण्याची पातळी फारच कमी झाली असून जेम-तेम 20 दिवसच पुरेल इतका पाणीसाठा या दोन्ही धरणात राहिला आहे.
त्यामुळे वसई विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धामणी हे मुख्य धरण वगळता दोन्ही धरणातला पाणी साठ्याची पातळी कमी होऊन देखील यंदा हि पाणीकपात केली जाणार आहे कि नाही याबाबत आयुक्त तथा उपअभियंता पाणीपुरवठा सुरेंद्र ठाकरे यांना संपर्क केला असता तो झाला नाही. वसई-विरार शहराला सूर्या-धामणी प्रकल्पातून 100 एमएलडी, सूर्या टप्पा -3 मधून 100 एमएलडी तर उसगाव 20 एमएलडी आणि पेल्हार धरणातून 10 एमएलडी पाणी म्हणजेच एकूण 230 एमएलडी पाणी प्रतिदिन मिळत आहे.परंतु आता जून संपत आला तरी वरुणराजाने अल्प हजेरी लावली असून हवी तशी दणकेबाज वृष्टी केलेली नाही.
त्यामुळे गतवर्षी पडलेल्या पावसाच्या धरणातील पाण्याचा साठा आता खालावत चालला असून या तीन धरणांपैकी जिल्ह्यातील पालघरच्या सूर्या-धामणी धरणात 276.35 घनमीटर दशलक्ष लिटर (90.141 दशलक्ष ) म्हणजेच 32.62 टक्के तर वसई तालुक्यातील उसगाव मध्ये 4.96 घनमीटर दशलक्ष (0.562 दशलक्ष), 11.33 टक्के आणि पेल्हार धरणात 3.56 दशलक्ष घनमीटर, (0.118 दशलक्ष ) म्हणजेच 3.31 टक्के इतकाच साठा शिल्लक आहे.
पावसाने जून संपला तरी अद्याप केवळ तोंडच दाखवले आहे, मात्र वसई विरारच्या शहरी व ग्रामीण भागात पुढील काही दिवसात पाणी कपातीचे मोठे संकट उभे राहणार हे तर नक्की आहे.
त्यामुळे सूर्या-धामणी धरणातील पाण्याचा विचार करून वसई विरार शहरात कुठेही पाणीकपात केली जाणार नाही, असे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले असले तरीही याकरिता वसई विरार महापालिकेला धरणात असलेल्या या पाण्याच्या पातळीनुसार धरण क्षेत्रात पाऊस पडेपर्यंत अतिशय काटेकोरपणे नियोजन करावे लागणार आहे.
म्हणजेच सूर्याच्या दोन्ही योजनांतून 200 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणीपुरवठा होत असून तो साधारण 365 दिवस पुरेल, तर उसगाव धरणातून 20 तर पेल्हार मधून 10 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणीपुरवठा होत आहे. यात आता उसगाव धरणांत 18 दिवस आणि पेल्हार धरणात केवळ 8 दिवस पुरेल इतकाच असल्याचे हि आकडेवारीवरून स्पष्ट होते असल्याचे सांगितले .
पाणीपुरवठा विभागाचे आवाहन !
तसेच वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रातील नागरिकांना पाण्याची समस्या किमान काही महिने भेडसावणार नाही, इतका साठा असल्याचे स्पष्ट केले असून नागरिकांनी देखील पाण्याचा अपव्यय न करता काटकसरीने पाणी वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
‘वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाºया वसई तालुक्यातील दोन धरणामधील पाण्याची पातळी खालावली असून जेमतेम महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. तरी मात्र पालघर जिल्ह्यातील सूर्या- धामणी धरणात अजूनही वर्षभर पुरेल इतका म्हणजेच 32.62 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली.’
नियोजन व गळतीबाबत पथक फिरती करा-नागरिक
वसई-विरार शहर महापालिकेने धरणातील पाण्याची पातळीचे निरीक्षण करून आणि शहरात होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी अभ्यासपूर्ण नियोजन करणे आवश्यक आहे, तसे प्रयत्न न केल्यास हजारो लिटर पाणी वाया जाईल व धरणातील साठा पाहता पाणी संकट निर्माण होण्याची शक्यता अधिक होईल, असे मत स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत, तर याबाबत महापालिकेने गळती प्रतिबंधक पथक तयार करून ते ठिकठिकाणी फिरते ठेवले पाहिजे.