वसई पूर्व पश्चिम भागाला पाणीपुरवठा करणारी सूर्याची मुख्य जलवाहीनी गोखीवरे चिंचपाडा येथे पुन्हा दुसऱ्यांदा फुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2021 04:20 PM2021-10-17T16:20:51+5:302021-10-17T18:38:53+5:30
सोमवारी होणार दुरुस्तीचे काम; २४ तास बंद राहणार पाणीपुरवठा
-आशिष राणे
वसई: वसई विरार शहर महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाची मुख्य जलवाहिनी रविवार दि १७ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास वसई पुर्वेस गोखीवरे चिंचपाडा येथे फुटून नादुरुस्त झाल्यानं येथील शहरांतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, रविवार दि १७ ऑक्टोबर रोजी सकाळी येथील वसई पूर्व पश्चिम विभागात मोडणाऱ्या नवघर माणिकपूर शहर,वसई गाव आणि नवघर पूर्व, डी प्रभागातील एव्हरशाईन,वसंत नगरी भागास पाणी पुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाची ( ७८८ )मि मी व्यासाची (एम एस) पाईपलाईन रविवारी सकाळी अचानकपणे पुन्हा दुसऱ्यांदा वसई पूर्वेतील गोखीवरे चिंचपाडा येथे क्लासिक कंपनी समोर फुटल्याने शहरांतील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या नियंत्रक अधिकाऱ्याने लोकमत ला दिली.
आता तातडीने तिच्या दुरुस्तीचे काम रवि वारी हातीं न घेता हे काम सोमवार दि १८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता सुरू करण्यात येणार आहे असे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केलं तसेच तिच्या दुरुस्ती साठी दिवसभर म्हणजेच २४ तास लागणार असल्याने शहरातील तिन्ही प्रभागातील भागात पाणी पुरवठा पूर्ण पणे बंद राहील सोबत जरी पाणी पुरवठा सुरू झाल्यावर देखील तो पुढील एक ते दोन दिवस अनियमित आणि कमी दाबाने होईल,त्यामुळे शहरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे आणि वसई विरार महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन नवघर माणिकपूर शहराच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे. एकंदरीतच एन उन्हाच्या तडाख्यात दोन ते तीन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याने नागरिकांनी नुसती चिंताच व्यक्त न करता नाराजीही ही व्यक्त केली.