घरत यांना निलंबित करा
By Admin | Published: October 12, 2016 03:51 AM2016-10-12T03:51:00+5:302016-10-12T03:51:00+5:30
एका बेकायदा बांधकामप्रकरणी चुकीचे कारवाई करून त्याला संरक्षण देणारे सहाय्यक आयुक्त राजेश घरत यांच्यावर कारवाई करण्यात यावी
वसई : एका बेकायदा बांधकामप्रकरणी चुकीचे कारवाई करून त्याला संरक्षण देणारे सहाय्यक आयुक्त राजेश घरत यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार आनंद ठाकूर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
नवघर-माणिकपूर शहरातील १०० फुट रोड येथील सुप्रसिद्ध एव्हरशाईन इस्टेट सोसायटीमध्ये झुझर इस्माईल पटेल यांनी त्यांच्या घरासमोर सोसायटीच्या आवारात केलेल्या अनधिकृत आलिशान बांधकामाविरुद्ध सोसायटीने गेल्या ९ महिन्यापूर्वी रितसर तक्रार करूनही त्याची दखल सहाय्यक आयुक्त राजेश घरत यांनी घेतली नाही. याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार आनंद ठाकूर यांनी आयुक्त सतीश लोखंडे यांच्याकडे या बाबतीत विचारणा केल्यावर आयुक्तांनी अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या सूचना दिल्यावरून घरत यांनी अनधिकृत बांधकाम करणाऱ्या झुझर पटेल यांना अनधिकृत बांधकाम पाडण्याकरता नोटीस बजावली होती. मात्र, जाणीवपूर्वक जुजर पटेल असे चुकीचे नाव लिहून नोटीस बजावली. जेणेकरून कोर्टामध्ये स्टे मिळेल. त्यानंतर स्टे मिळाल्याचे कारण सांगून वेळ मारून नेली. अशाप्रकारे नाव चुकवणे, सातबारा नंबर चुकवणे इ. प्रकार पालिकेतील सहा.आयुक्त करीतच असतात, याकडे आमदार ठाकूर यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.
काय आहे परिस्थिती-
नोटीस चुकीची असल्याने झुझर पटेल यांच्या बांधकामांना अपेक्षेप्रमाणे कोर्टातून स्टे मिळाला. परंतु सोसायटीचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि आमदार आनंद ठाकूर यांच रेट्यामुळे महापालिकेने न्यायालयीन प्रक्रिया करून स्टे उठवला. स्टे उठल्यानंतरही घरत कारवाही करीत नव्हते. शेवटी पुन्हा एकदा आमदार ठाकूर यांनी आयुक्त लोखंडे यांना पत्र देऊन या अनधिकृत बांधकामावर कारवाही करावी अन्यथा आम्हाला दखल घ्यावी लागेल असा इशारा दिल्यानंतर हे बांधकाम पाडण्यात आले.
...तरी एमआरटीपीचा गुन्हा नाही?
च्बांधकाम पाडते वेळी झुझर पटेल यांनी पालिका अधिकारी नितीन वनमाळी यांच्या अंगावर धाऊन गेले. कॉलर पकडून धक्काबुक्की केली आणि बघून घेईन, सोडणार नाही अशी धमकी देऊन शिवीगाळ केली.
च्त्याचबरोबर दुसरे अधिकारी कौस्तुभ ताबोरे यांचाही गळा पकडून धमकी दिली. यावेळी अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी संरक्षण देण्याकरीता असणारी पोलीस यंत्रणा हजर असतनाही झुझर पटेल यांचेवर एम.आर.टी.पी. कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला नाही.
च्यावेळी घरत स्वत: घटनास्थळी हजर होते. पण, कारवाई झाल्यानंतर पटेल यांच्यावर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा नोंदवणे आवश्यक असताना नोंदवण्यात आला नाही. त्यामुळे याप्रकरणात घरत कर्तव्य बजावण्यात कसूर करत असून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी आमदार ठाकूर यांनी आयुक्तांकडे केली आहे.