वसईचे ४ सहायक आयुक्त निलंबित, आयुक्तांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 03:32 AM2017-10-31T03:32:45+5:302017-10-31T03:32:48+5:30
अनधिकृत बांधकामांवर कारवाई न करणे, वरिष्ठांची दिशाभूल करणे, असे अनेक ठपके ठेऊन वसई-विरार महापालिकेच्या चार सहायक आयुक्तांना सोमवारी दुपारी निलंबित करण्यात आले.
वसई : अनधिकृत बांधकामांवर कारवाई न करणे, वरिष्ठांची दिशाभूल करणे, असे अनेक ठपके ठेऊन वसई-विरार महापालिकेच्या चार सहायक आयुक्तांना सोमवारी दुपारी निलंबित करण्यात आले. मात्र, अनधिकृत बांधकामाला पाठीशी घातल्याने गुन्हा दाखल असलेल्या सहायक आयुक्तांना मोकाट सोडल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.
प्रदीप आवडेकर, गणेश पाटील, मोहन संख्ये आणि प्रकाश जाधव अशी निलंबित करण्यात आलेल्या सहायक आयुक्तांची नावे आहेत. विकास आराखड्यातील आरक्षित भूखंडावर, ना विकास क्षेत्र, सरकारी, खासगी भूखंडावर मोठ्या प्रमाणवर अनधिकृत बांधकामे झाली आहेत. अधिकारी म्हणून प्रभागातील बेकायदेशीर बांधकामांची दैनंदिन पाहणी करून, कारवाई करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे, वरिष्ठांची दिशाभूल करणे, न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये न्यायालयाची स्थगिती उठविण्यात उदासीनता दाखविणे, अनधिकृत धार्मिकस्थळांच्या निष्कासनाबाबत पुरेसे नियोजन न करणे, आदी ठपके ठेऊन चारही सहायक आयुक्तांवर ही कारवाई आयुक्तांनी केली. धक्कादायक म्हणजे, हरित लवादाचा निर्णय आल्यानंतर पालिकेने अनधिकृत बांधकामप्रकरणी कारवाई केल्याचे चित्र उभे करण्यासाठीच, चार सहायक आयुक्तांचा बळी दिल्याची चर्चा आहे. कारण एका सहायक आयुक्तावर अनधिकृत बांधकामाला पाठीशी घातल्याने वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यांच्यासह इतर सहायक आयुक्तांना राजकीय दबावापोटी पाठीशी घालण्यात येत असल्याची चर्चाही पालिकेत आहे.
२५ आॅक्टोबरला बजावली नोटीस
४ सहायक आयुक्तांना २५ आॅक्टोबर रोजी चार दिवसांची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. प्रत्यक्षात नोटीस २७ आॅक्टोबरला दुपारी देण्यात आली. त्यानंतर, शनिवार, रविवार असे सुट्टीचे दोन दिवस होते. नोटिसीला उत्तर देण्यास पुरेसा अवधी न देताच, सोमवारी दुपारी निलंबनाची कारवाई केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.