नितीन भगतची हत्या झाल्याचा कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 01:03 AM2018-01-20T01:03:02+5:302018-01-20T01:03:18+5:30
विरार पश्चिमेकडील अर्नाळा समुद्रकिनारी नितीन भगत (२४) या तरुणाचा मृतदेह आढळला असून त्याच्या कुुटुंबियांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे.
वसई : विरार पश्चिमेकडील अर्नाळा समुद्रकिनारी नितीन भगत (२४) या तरुणाचा मृतदेह आढळला असून त्याच्या कुुटुंबियांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे.
विरार पूर्वेकडील गोपचरपाडा येथे राहणारा नितीन भगत हा रिकव्हरीचे काम करायचा. रविवारी रिकव्हरीसाठी नितीन अर्नाळा परिसरात गेला होता. तेव्हापासून तो गायब होता. त्याच्या कुुटुंबियांनी विरार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर स्वत: शोधमोहिम हाती घेतली. चार दिवस बेपत्ता असलेल्या नितीनचा मृतदेह गुरुवारी अर्नाळा समुद्रकिनारी मामाची वाडी येथे कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास नितीन रिकव्हरीसाठी घराबाहेर पडला होता. सव्वासहाच्या सुमारास अर्नाळा येथील भालचंद्र पाटील यांच्याकडे कलेक्शनसाठी गेला होता. मात्र, त्यांच्या घरी न जाता नितीनने त्यांना फोन करून सुभाष लेन येथे बोलावून घेतले होते. भालचंद्र पाटील नितीनला भेटायला गेले त्यावेळी दोन जण त्यांच्याशी गप्पा मारत होते. पैसे दिल्यानंतर पाटील आपल्या घरी निघून गेले होते. त्यानंतर नितीन बेपत्ता झाला होता.
नितीनचा मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, कुटुंबियांनी नितीनची हत्या झाल्याचा संशय व्यक् केल्याने पंचनामा करून मृतदेह जेजे हॉस्पीटलमध्ये पाठवून दिला आहे. नितीन बेपत्ता झाला त्यावेळी त्याच्याजवळ कलेक्शनचे रोख
पासष्ट हजार रुपये रोख आणि स्वत:कडील दहा हजार रुपये ७५ हजार रुपये होते. पण, मृतदेहाजवळ फक्त दोनशे रुपये आणि मोबाईल फोन आढळून आला आहे.
त्यामुळे पोलिसांनी नितीनसोबत बोलणाºया दोन अज्ञात इसमांचा तपास सुरु केला आहे.