वाड्यातील सामन्यात तिरंगी लढतीच लक्षवेधी, नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 03:20 AM2017-12-12T03:20:19+5:302017-12-12T03:21:05+5:30
वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून गीतांजली कोळेकर, भाजपकडून निशा सवरा, काँग्रेस कडून सायली पाटील, बहुजन विकास आघाडीकडून अमृता मोरे तर माकपकडून गुलाब दाभाडे या रिंगणात आहेत. या पंचरंगी लढतीमध्ये ही शिवसेना, भाजप व काँग्रेस यामध्ये होणारी तिरंगी लढतच लक्षवेधी ठरणार आहे.
- वसंत भोईर
वाडा : वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून गीतांजली कोळेकर, भाजपकडून निशा सवरा, काँग्रेस कडून सायली पाटील, बहुजन विकास आघाडीकडून अमृता मोरे तर माकपकडून गुलाब दाभाडे या रिंगणात आहेत. या पंचरंगी लढतीमध्ये ही शिवसेना, भाजप व काँग्रेस यामध्ये होणारी तिरंगी लढतच लक्षवेधी ठरणार आहे.
वाडा नगरपंचायतीची सदस्य संख्या १७ असून नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार आहे. नगराध्यक्षपदासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार उभे केले असले तरी खरी लढत ही भाजप, शिवसेना व काँग्रेस मध्येच होणार आहे. भाजपकडून आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांची कन्या निशा सवरा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्या आसमंत या संस्थेच्या माध्यमातून गेली तीन वर्षे समाजकार्यात आहेत. तर शिवसेनेच्या गीतांजली कोळेकर यांनी लघुपाटबंधारे खात्यात सेवा बजावून दोन वर्षापूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.
निशा सवरा व गीतांजली कोळेकर या दोन्ही आजी माजी आमदारांच्या मुली असल्याने त्यांना राजकारणाचे बाळकडू घरातच मिळाले आहे.
काँग्रेसच्या सायली पाटील कॉलेज जीवनापासून समाजकार्यामध्ये असून सध्या त्या एका खासगी शाळेत अध्यापनाचे काम करीत आहेत. अमृता मोरे या सध्या शिक्षण घेत आहेत. हे सर्व उमेदवार मतदारांना परिचित असल्याने निवडणूक रंगतदार होणार आहे.
वाडा शहराला नागरी समस्यांनी ग्रासलेले आहे. पाणी, रस्ते, आरोग्य, स्वच्छता या प्रमुख या समस्या सोडविण्यात भाजप, शिवसेना या सत्ताधारी पक्षांसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधी पक्षांना अपयश आले आहे. या पक्षांना विरोधी भूमिका नीट बजावता न आल्याने शहराचा विकास खुंटलेला आहे.