परिवहन सेवेतील ताडी बहाद्दरन बस चालक, वाहक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 11:22 PM2019-06-03T23:22:35+5:302019-06-03T23:22:40+5:30
लोकमताचा जबरदस्त दणका : ऑन ड्यूटी गेले होते ताडीच्या गुत्त्यावर, अनेकांची सुटली सवय
वसई : महापालिकेच्या परिवहन सेवेचे दोघे बस चालक आणि वाहक शनिवारी चक्क ऑन ड्यूटी नवापूर येथे गुत्त्यावर ताडी विकत घेण्यासाठी गेल्याचे सचित्र वृत्त दै.लोकमतने दि.३ जूनच्या सोमवारी अंकात प्रसिद्ध करताच त्या दोघांनाही प्रशासनाने तडकाफडकी निलंबीत केले आहे.
या घटनेची व दणकेबाज वृत्ताची गंभीर दखल घेत दोघा चालक व वाहकांच्या गैरवर्तनाबाबत वसई-विरार शहर महापालिका परिवहन सेवा म्हणून ठेका असलेल्या भगीरथ ट्रान्सपोर्ट कं.च्या चौकशी अधिकाऱ्यांनी या बसचालक व वाहकाला सेवेतून निलंबित केले आहे.
बस चालक शकील जबरा तडवी बिल्ला क्र .१३६८६ रा.मोहराळे जि.जळगाव आणि बस वाहक महेश पांडुरंग भोये, बिल्ला क्र .१२८०२ रा.उटावली विक्रमगड, जि.पालघर अशी या दोघाची नावे आहेत.
शनिवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास एमएच ०४ इके ११६६ या क्रमांकाची बस नवापूर नाक्यावर थांबली. त्यानंतर ताडी पार्सल घेण्यासाठी बसचे वाहक व चालक दोघेही गणवेशातच नजीकच्या ताडीच्या गुत्त्यावर पोहोचले, त्यांनी तेथून दोन बाटल्या ताडी घेतली आणि ते पुन्हा बसमध्ये परतले. खुले आम रस्त्यावरून चालत पिशवीत ताडीच्या बाटल्या घेऊन ते बसमध्ये चढले. विशेष म्हणजे विकत घेतलेल्या ताडीच्या बाटल्या चक्क बसमध्ये घेऊन ते चढले व पुन्हा पुढच्या प्रवासाला सुरुवातही केली होती.
वसई परिवहनचे चालक,वाहक ‘ताडी’ पिऊन चालवतात बसेस
अखेर ही ताडीच या दोघांना नडली असून घडल्या प्रकारामुळे वसई-विरार शहर महापालिका परिवहन सेवेचे नाव बदनाम तर झाले मात्र नशीब बलवत्तर म्हणून कुठे अपघात झाला नाही, मात्र या दोघाना परिवहन सेवेकडून निलंबित केल्याचे पत्रच पालिका परिवहन चौकशी अधिकाºयाने सोमवारी काढले. यामुळे परिवहनमधील इतर ताडीबाजांचे धाबे दणाणले आहे.
परिवहनने कुठला धडा घेतला ?
पालिकेचे चालक आणि वाहक मद्यपान करून आजही सर्रास गाड्या हाकतात तर अशा प्रवृत्तीवर कायम स्वरूपी कठोर कारवाईची आवश्यकता आहे. गंभीर म्हणजे दररोज कुठे न कुठे परिवहन सेवेचे चालक व वाहक हे खास करून ग्रामीण भागात बस थांबवून त्यामध्ये मद्यपानही करतात व त्याची वाहतूकही करतात, असे बरेच प्रकार प्रवाश्यांच्या तोंडून ऐकावयास मिळतात.मात्र एखादा फोटो अथवा व्हीडिओ वायरल झाल्यावरच महापालिका त्यांच्यावर कारवाई करते ही शोकांतिका आहे.