ते पाणी भरण्यास टँकर्सना मज्जाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 01:33 AM2017-07-29T01:33:49+5:302017-07-29T01:33:54+5:30
गोखीवरे येथील डबक्यात साचलेले पावसाचे पाणी लोकांना पाजण्यासाठी नेणाºया टँकर्सना या परिसरात येण्यास बिल्डरांनी रस्त्यांवर मोठाले पाईप टाकून मज्जाव केला आहे.
शशी करपे
वसई : गोखीवरे येथील डबक्यात साचलेले पावसाचे पाणी लोकांना पाजण्यासाठी नेणाºया टँकर्सना या परिसरात येण्यास बिल्डरांनी रस्त्यांवर मोठाले पाईप टाकून मज्जाव केला आहे.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून दररोज हजारो शहरवासियांच्या आरोग्याशी खेळणाºया टँकरलॉबीवर कारवाई करण्याकडे महापालिका आणि महसूल खाते दुर्लक्ष करीत असल्याने संताप व्यक्त होतो आहे.
गोखीवरे येथील मधुबन परिसरात मोकळा जागेत आणि डबक्यात साचलेले पावसाचे पाणी पाच पंप लावून टँकरद्वारे पिण्यासाठी पुरवण्यात येत असल्याची धक्कादायक बाब लोकमतने उजेडात आणली होती. गेल्या काही दिवसांपासून टँकरवाले हे दूषित आणि अक्षरश: घाण पाणी पिण्यासाठी म्हणून नवघर-माणिकपूर आणि नालासोपारा परिसरातील हजारो लोकांना विकत होते. पण, त्यावर वसई विरार महापालिका अथवा महसूल खात्याकडून कोणतीच कारवाई केली जात नव्हती.
ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिकेने आपला अधिकारी पाठवून पंचनामा केला. तर महसूल खात्याच्या एका तलाठ्याने जागेचा पंचनामा केला. जनतेच्या आरोग्याशी खेळणाºया टँकरवाल्यांवर कोणतीच कारवाई केली नाही. सध्या वसई विरार परिसरात साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे. अशावेळी महापालिका आणि महसूल खात्याकडून टँकर लॉबीवर कारवाई होणे अपेक्षित असतांना त्यांच्याकडून ती न झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, येथील बिल्डरांनी एकत्रित येऊन मधुबन रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठाले पाईप टाकून टँकर्सना पाणी भरण्यापासून मज्जाव केला आहे. तसेच पंप काढून टाकले आहेत. त्यामुळे सध्या टँकरद्वारे होणारा दुषित पाणी पुरवठा बंद झाला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे टँकर पाणी भरत असलेल्या डबक्याकडे जाणारा रस्ता नक्की कुणी बंद केला याची माहिती महापालिका आणि महसूल खात्याला नव्हती. हा रस्ता बिल्डरांनीच बंद केल्याची माहिती लोकमतने मिळविली.
दरम्यान, गेल्या चार वर्षांपासून महापालिकेने नवीन नळकनेक्शन देणे बंद केले आहे. त्यामुळे वसई विरार परिसरात पाणी टंचाई जाणवत आहे. त्यातूनच टँकर माफियांनी धुमाकूळ घातला आहे. दुषित पाणी पुरवठा करणाºया टँकर माफियांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या गटनेत्या किरण चेंदवणकर यांनी केली आहे.