पर्ससीन धारकांवर कारवाई करा!
By admin | Published: January 22, 2016 02:03 AM2016-01-22T02:03:04+5:302016-01-22T02:03:04+5:30
पालघर, वसई, डहाणू, जाफराबादच्या समुद्रातील निषीद्ध क्षेत्रात शिरून पर्ससीन धारकांनी स्थानिक मच्छीमारांवर हल्ले करीत त्यांच्या भागातील हजारो किलो
पालघर : पालघर, वसई, डहाणू, जाफराबादच्या समुद्रातील निषीद्ध क्षेत्रात शिरून पर्ससीन धारकांनी स्थानिक मच्छीमारांवर हल्ले करीत त्यांच्या भागातील हजारो किलो मासे ओरबाडून नेत आहेत. त्यांची दादागिरी थांबविण्यात मत्स्य व्यवसाय विभाग अपयशी ठरत असल्याच्या आजच्या (२१ जाने.) लोकमतच्या वृत्ताची दखल खा. चिंतामण वनगा यांनी घेऊन मत्स्यव्यवसाय आयुक्तांसह, पालघर पोलीस अधिक्षकांनी योग्य ती कारवाई करण्याचे पत्र पाठवले आहे.
समुद्रातील ओएनजीसीच्या तेलविहिरीच्या वाढत्या क्षेत्रामुळे मच्छीमारांना मासेमारीसाठी क्षेत्र कमी पडत असताना त्यांच्या क्षेत्रामध्ये पर्ससीन ट्रॉलर्सची घुसखोरी वाढत चालली आहे. मुंबईच्या धक्कयावरून मासेमारीसाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या या ट्रॉलर्स १२ नॉटीकल या निषीद्ध क्षेत्रात घेऊन मासेमारी करीत आहेत. डहाणूच्या समोरील समुद्रातील १५ टन घोळ मासे मुंबईच्या पर्ससीन नेटधारकानी पकडून नेले असताना जाफराबादच्या समुद्रात मासेमारीसाठी आलेल्या पर्ससीन धारकांना स्थानिकांनी विरोध केल्याचा राग येवून देवासी येथील लिंबाभाई बारीया यांच्या वेनूप्रसाद (२१ नोव्हेंबर रोजी) बोटीला पर्ससीन ट्रॉलर्सनी धडका देऊन भर समुद्रात बुडवीली होती. त्या नौकेतील नऊ खलाशांना वाचविण्यात यश आले असले तरी स्थानिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. त्यातच त्यांची दहशत थांबविण्यात व त्यांच्यावर कारवाई करण्यात मत्स्य व्यवसाय विभाग व यलोगेट पोलीस अपयशी ठरले आहेत.
वडराई येथील लहान मच्छीमार १८ जानेवारी रोजी समुद्रात मासेमारीला गेले असताना त्यांच्या कवीला अडकून पर्ससीन जाळे समुद्रात तरंगु लागल्यानंतर त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या स्थानिक मच्छीमारांना धमक्या देऊन ट्रॉलर्सची धडक देऊन नौका बुडवून टाकण्याची भाषा केल्या होत्या. त्यामुळे सर्व स्थानिक भितीने मासेमारी न करताच रिकाम्या हाताने परत आले होते. यासंदर्भात लोकमतने आज हॅलो पालघर वसई मध्ये वृत्त प्रकाशित केल्यानंतर पालघरचे खा. चिंतामण वणगा यांनी मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त एम. बी. गायकवाड यांना पत्र पाठवुन बारा नॉटीकल निषीद्ध क्षेत्रात घुसखोरी करून मच्छीमारावर दबाव आणून नौकाचे नुकसान करून मासेमारी करीत असल्याने योग्य ती कारवाई करण्याचे पत्र पाठवले आहे. मत्स्य व्यवसाय विभागाकडे गस्ती नौका नसल्याचे कारण पुढे करीत असल्याने योग्य ती कार्यवाही करून पर्ससीन ट्रॉलर्सवर कारवाई करण्याचे पत्र दिले आहे.
तर समुद्रात होत असलेल्या वादावादीमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून पालघर पोलीस अधिक्षीका शारदा राउत यांनी लक्ष घालावे असेही मी सांगितल्याचे खा. वणगा यांनी लोकमतला सांगितले. (वार्ताहर)