सेवगा गडाने घेतला मोकळा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 11:14 PM2018-07-27T23:14:23+5:302018-07-27T23:14:43+5:30
पालघर जिल्ह्यातील विविध चार संघटनेचे ५५ तरुण सहभागी
- शशिकांत ठाकूर
कासा : डहाणू तालुक्यातील करंजवीरा जवळील सेवगा गडाचे संवर्धनासाठी पालघर जिल्ह्यातील चार विविध संघटनेतील दुर्गमित्रांनी एकत्र येऊन मोहीम राबविली. गत दीडशे वर्षांपासून व्यवस्थे आभावी जिर्णता आलेल्या या शिवकालिन गडावर राबविलेली ही आठवी मोहिम असून यावेळी माती खाली गाडल्या गेलेल्या पाण्याच्या टाक्या व त्यांचे झरे मोकळे करण्यात आले.
डहाणू तालुक्यातील मुंबई अहमदाबाद महामार्गलगत करंजवीरा जवळ हा प्राचीन शिव कालीन किल्ला आहे. तेथे जाण्यासाठी आंबोली व ओसरविरा गावा जवळून जाण्यासाठी रस्ता आहे. दीड ते दोन किमी अंतर पार करत एक ते दीड तासाने गडावर जाता येते. गडावर शिवकालीन शिवमंदिर आहे. परिसरातील नागरिक दर नारळी पौर्णिमेला तेथे मोठया प्रमाणावर पूजेसाठी जातात.
किल्ले वसई मोहीम परिवार, युवा शक्ती प्रतिष्ठान पालघर, स्वामी समर्थ केंद्र सफाळे, समस्त दुर्गमित्र परिवार महाराष्ट्र या चार दुर्गसंवर्धक संस्थानीं एकत्र येत सेवगागड प्राचीन टाक्या (कुंड) स्वच्छता मोहीम राबविली. ही मोहिमेत विरार नायगाव वसई सफाळे, पालघर व डहाणू भागातील एकूण ५५ दुर्गमित्र सहभागी झालेले होते. या ठिकाणी एकूण सात टाके (कुंड) असून दुर्गमित्रांनी प्राचीन अनघड टाके (कुंड) व वनस्पती टाके (कुंड) संवर्धनासाठी श्रमदान केले.
या मोहिमेची सुरुवातील दुर्गमित्रांनी इतिहास अभ्यासक डॉ. श्रीदत्त राऊत यांचे मार्गदर्शन घेतले. यात प्राचीन टाके, शिवकालीन बालेकिल्ला व्यवस्था, आज्ञापत्र व दुर्गबांधणी, माची दरवाजा, मुख्य महादरवाजा मार्ग, माची बुरु ज, श्री शिवमंदिर, श्री हनुमान मंदिर आदी स्थळांवर राऊत यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर दुर्गिमत्रांनी बालेकिल्ला बुरु जाच्या खालील अंगास असणाऱ्या अनघड टाके स्वच्छता मोहिमेत ५००० हुन अधिक घमेली मातीचा गाळ, चिखल, दगड कुंडातून बाहेर काढला.
ही अनघड टाके (कुंड) गेली किमान १५० वर्ष मातीच्या गाळाखाली बंदीस्त होत आलेली होती. दुर्गमित्रांनी गडाचे अस्तित्व राखण्याच्या उद्देशाने व गडावर पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी चिकाटीने श्रमदान केले. या मोहिमेतील गाळात कोणतेही ऐतिहासिक अवशेष प्राप्त झाले नाहीत. या टाक्यांची (कुंडाची) पाण्याची क्षमता सुमारे ४० हजार लीटर इतकी आहे. श्रमदानाच्या दुसºया सत्रात दुर्गमित्रांनी आणखी एक वनस्पती टाके (कुंड) स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला.
गडाच्या संवर्धनासाठी ही आठवी मोहिम
ही मोहिम राबवित असताना दुर्गमित्रांनी गडावर काही फळझाडांचे रोपण केले. आजच्या संवर्धन मोहिमेचे नेतृत्व आतिष पाटील व जयदीप चौधरी यांनी केले. अपरिचित सेवगा गडाच्या संवर्धनासाठी ही आठवी मोहीम होती.
यावेळी पालघर जिल्ह्यातील दुर्गसंवर्धन व अभ्यास मोहिमेत गेली १५ वर्ष सातत्याने योगदान देणाºया किल्ले वसई मोहीम परिवार व सिद्देश गजानन म्हात्रे परिवाराचा युवा शक्ती प्रतिष्ठान पालघर अंतर्गत सत्कार करण्यात आला.
या मोहिमेसाठी स्थानिक दर्गमित्र व शिवसेना तालुका प्रमुख संतोष वझे यांनी सकाळचा अल्पोपहार व वृक्षारोपणासाठी झाडे उपलब्ध करून मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाची सांगता स्वराज्याच्या वीरांना मानवंदना देऊन करण्यात आले.