मुलांना मोबाइल देताना घ्या काळजी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 04:51 AM2019-01-20T04:51:53+5:302019-01-20T04:52:01+5:30
आपण आपल्या मुलांच्या हाती इंटरनेट पॅक असलेला स्मार्ट फोन देतो, परंतु हेच मोबाइल आणि इंटरनेट त्यांच्या आत्महत्येला कसे कारणीभूत ठरू शकतात, याचा दाहक अनुभव नालासोपाऱ्यातील नागोरी कुटुंबीयांना आला आहे.
वसई : आपण आपल्या मुलांच्या हाती इंटरनेट पॅक असलेला स्मार्ट फोन देतो, परंतु हेच मोबाइल आणि इंटरनेट त्यांच्या आत्महत्येला कसे कारणीभूत ठरू शकतात, याचा दाहक अनुभव नालासोपाऱ्यातील नागोरी कुटुंबीयांना आला आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना मोबाइल देताना त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.
नागोरी कुटुंबातील हुजेफा अजगर अली नागोरी (वय १३) याने मंगळवारी रात्री उद्यानातील झोक्याच्या रॉडला नायलॉनच्या दोरीचा गळफास लावून आत्महत्या केली. महत्त्वाची बाब म्हणजे, आत्महत्या म्हणजे काय, ती गळफासाने कशी करतात? याची माहिती इंटरनेटवरून कुतूहलापोटी मिळविली आणि तिचा प्रयोग करून पाहात असताना, त्याच्या हातून त्याची आत्महत्या खरोखरच घडली.
रश्मी रेसिडन्सी येथे १५ जानेवारी रोजी ही धक्कादायक घटना घडली आहे. हुजेफा आपल्या कुटुंबासोबत राहत होता. तो सेठ विद्यामंदिरात आठव्या इयत्तेत शिकत होता. या प्रकाराची माहिती मिळताच तुळींज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदन साठी पाठविला व आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
पोलीस तपासात हुजेफाच्या दप्तरात त्याच्या मृत्यूबद्दल काही संशयास्पद धागेदोरे मिळाले आहेत. हुजेफाने वहीत काही आकृत्या काढल्या असून, लिखाणही केले आहे. आत्महत्येची वेळ व ठिकाण त्याने त्यात लिहिलेले आहे. त्याचा या आत्महत्येशी काही संबंध आहे का, याचा पोलीस तपास करीत आहेत. पंख्याला दोरी बांधलेले चित्र, तसेच आत्महत्या केलेल्या ठिकाणाची नोंद त्याने वहीत केलेली होती. इंटरनेटवर वेगवेगळे व्हिडीओ तो पाहायचा. त्याचा परिणाम त्याच्या बालमनावर झाला असावा.
हुजेफाच्या आत्महत्येने इंटरनेटचे दुष्परिणाम पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मैदानी खेळ सोडून मुले आभासी विश्वात रमत आहेत. त्याचाच परिणाम मोठ्या प्रमाणात लहानग्यांच्या मानसिक स्वास्थावर होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.