परगावी जातांना घरांची घ्या काळजी
By admin | Published: May 1, 2017 05:49 AM2017-05-01T05:49:15+5:302017-05-01T05:49:15+5:30
सद्यस्थित परिक्षा व शाळां कॉलेजेसना सुटटी लागल्याने शहरवासिय मोठ्या प्रमाणात बाहेरगावी जात आहेत. चोरांसाठी
विक्रमगड : सद्यस्थित परिक्षा व शाळां कॉलेजेसना सुटटी लागल्याने शहरवासिय मोठ्या प्रमाणात बाहेरगावी जात आहेत. चोरांसाठी हा काळ सुगीचा ठरू नये याकरीता नागरीकांनी काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सुटीचा मोसम म्हणजे चोरटयांसाठी सुगीचा काळ त्यामुळे सुटीची मजा लुटा पण त्याबरोबरच सावधगीरीही बाळगा, असा सल्ला विक्रमगडमधील पोलिसांनी नागरिकांना दिला आहे. जनजागृती करुन चोऱ्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिस प्रशासनामार्फत दक्षतेचा सल्ला दिला जात आहे़ गेल्या काही महिन्यांत गुन्हयांचे विशेषत: घरफोडयांचे प्रमाण वाढले होते व त्या अनुषगांने गुन्हयांची उकल होवुन चोरटयांना जेरबंद केले आहे़ मात्र मुखत्वे सुटटीच्या दिवसात बरेच नागरिक बाहेर गावी जातात़ नेमकी हीच संधी साधून चोरटे आपला डाव साधत असतात़ चोरी झाल्यानंतर पोलिस प्रशासनाला लक्ष्य केले जाते़ मात्र चोरी होउ नये यासाठी नागरिकांनीही आधी स्वत:हुन काळजी घेणे, दक्ष राहाणे व बाहेर जातांना त्यांची खबर पोलिसांना देणे गरजेचे आहे़ असे पोलिसांचे म्हणणे आहे़ बाहेरगावी जाण्यापूर्वी दारे, खिडक्या काळजीपूर्वक बंद कराव्यात, वॉचमन नेमतांना त्याची संपूर्ण माहिती घ्यावी, शक्यतो विश्वासातील परिचयातील व्यक्तींनाच वॉचमन म्हणून नेमावे, भाडेकरु ठेवतांनाही तो पूर्वी कुठे राहात होता, त्याची सामाजिक पार्श्वभूमी याची माहिती घेउनच ठेवावा, दागीने, मौल्यवान वस्तू, बँकांच्या लॉकर्समध्ये ठेवावेत, अशा महत्वाच्या सूचनाही पोलिस प्रशासनामार्फत देण्यांत आल्या आहेत़
जनजागृतीच्या उददेशाने पोलिसांनी हाती घेतलेली ही मोहिम नागरिकांसाठी उपयुक्त ठरेल व घरफोडयांचे प्रमाण कमी होईल,असा विश्वासही यावेळी व्यक्त केला़ (वार्ताहर)
विक्रमगड व परिसरातील रहिवाशांनी सुटीत बाहेरगावी जाण्यापूर्वी प्रथम स्थानिक पोलिस कार्यालयात याची माहिती नोंदवणे गरजेचे आहे़ त्याचबरोबर बाहेर गावी जाण्यापूर्वी आपल्या घराच्या दारे-खिडक्या काळीपूर्वक बंद कराव्यात, वॉचमन नेमतांना त्याची संपूर्ण पार्श्वभूमी, माहिती घ्या,भाडेकरु ठेवतांना त्याची पार्श्वभूमी माहिती करुन घ्या व त्याची नोंदही पोलिस कार्यालयात करा. प्रत्येकाने सतर्क राहीले पाहिजे़ मौल्यवान वस्तू, दाग-दागीने बाहेरगांवी जात असतांना घरात ठेवू नये, संशयीत व्यक्ती आढळल्यास त्याबाबत पोलिसांना सांगावे, आदी बाबी लक्षात घ्याव्यात़
-विजय शिंदे, पोलिस निरिक्षक विक्रमगड