तलासरी - डहाणूत भूकंपाचे जोरदार धक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 02:31 AM2019-07-26T02:31:40+5:302019-07-26T02:31:54+5:30
घर कोसळून एकाचा मृत्यू : उपाययोजनांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
तलासरी/डहाणू : पालघर जिल्ह्यातील तलासरी, डहाणू भागात गुरुवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे तीन जोरदार धक्के बसले. ३.८ रिश्टरच्या या भूकंपाने डहाणू तालुक्यातील एकाचा बळी घेतला. रिश्या मेघवाले असे त्यांचे नाव आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या भागाला भेट दिली असून मृताच्या नातेवाइकांना ४ लाखांची मदत जाहीर केली आहे.
नागझरी - वसावलापाडा येथील रिश्या हे शेतावरील घरात झोपले होते. भूकंपाच्या धक्क्याने घर त्यांच्या अंगावर कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तलासरी, डहाणू परिसरात गुरुवारी रात्रभर छोटे धक्के बसत होत. त्यात १ वाजून ३ मिनिटांनी ३.८ रिश्टरचे लागोपाठ बसलेले धक्के जोरदार होते. या धक्क्यांनी सवणे गावातील अनेक घरांना तडे गेले आहेत.
भूकंपाने तालुक्यातील ७५ शाळा, ५२ अंगणवाड्यांना तडे गेले आहेत. या शाळा - अंगणवाड्यांना तंबू टाकण्यासाठी महसूल विभागाने ताडपत्र्या पुरविल्या. पण त्या ताडपत्र्यांचे तंबू अजून तयार झालेले नाहीत. अंगणवाड्यांना तंबू बनवून देण्याबाबत ग्रामपंचायतींना विनंत्या करण्यात आल्या. याबाबतची दोन पत्रेही तलासरी गट विकास अधिकाऱ्यांना दिली. पण त्यांनी दखल घेतली नाही. तहसील कार्यालयाने ताडपत्र्या पुरवल्या तरीही त्यांचे तंबू बनवले का? याची पाहणी केली नाही. याबाबत तलासरीच्या तहसीलदार स्वाती घोंगडे म्हणाल्या, याबाबतची माहिती गुरुवारी ग्रामसेवकाकडून घेण्यात येईल. तलासरीचे बालविकास प्रकल्प अधिकारी आनंद जाधव यांनी सांगितले की, अंगणवाड्यांना तंबू बांधून देण्याबाबत दोन पत्रे पंचायत समितीच्या मिटिंगमध्ये देण्यात आली आहेत.
प्रशासनाने केली रिश्टर स्केलमध्ये दुरुस्ती
भूकंप मापक यंत्राने रात्रीच्या भूकंपाची नोंद ४.८ पाठविली. त्यात प्रशासनाने तत्काळ दुरुस्ती करून ती ३.८ रिश्टर असल्याचे जाहीर केले. पालघर जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांना धोकादायक शाळा, अंगणवाड्यांना तंबू बांधण्यासाठी पुरविण्यात आलेल्या ताडपत्र्यांबाबत विचारणा केली असता याची माहिती घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.